प्रतिनिधी जानवी घोगळे
आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या समित्या गठित
कोल्हापूर, दि.10 : जिल्ह्यात 4 ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान 8 तालुक्यांमध्ये साहित्य वाटपाबाबत तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकुण 2268 पात्र दिव्यांग लाभार्थी निवड करण्यात आली होती. यातील कोल्हापूर शहरातील पात्र व निवड केलेल्या लाभार्थ्यांना ‘अलिम्को’ मार्फत आवश्यक साहित्याचे वाटप रविवार दि.14 सप्टेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्या ही हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. इतर तालुकास्तरीय दिव्यांगांना त्या त्या तालुक्यात साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या आयोजना बाबत बैठक घेण्यात आली.
नियोजन बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे संबंधित कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी, अलिम्को संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर शहरातील पात्र व निवड केलेल्या सर्व दिव्यांगांना निरोप देणे, त्यांची ने-आण करणे यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत सूचना केल्या. कार्यक्रमस्थळी कोणतीही गैरसोय होवू देवू नका .यासह प्रत्येक कामांसाठी समन्यव समित्यांची स्थापना करुन जबाबदार अधिकारी कर्मचारी नेमण्याच्या सूचना त्यांनी केल्या. स्टेज, नोंदणी, बैठक, निमंत्रण, मंडप, संपर्क, वाहतूक, उल्पोपहार, स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य, वाहनतळ इ.समित्या नेमण्यात आल्या आहेत.
अलिम्को (Artificial Limbs Manufacturing Corporation of India) मार्फत दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यक साधने आणि साहित्याचे वाटप केले जाते. यामध्ये कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्रे, दृष्टिहीनांसाठी काठी, तसेच इतर उपकरणे यांचा समावेश असतो. हे वाटप सामान्यतः शासकीय योजनांद्वारे, शिबिरांमार्फत किंवा थेट लाभार्थ्यांना केले जाते, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारते आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत होते.महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे साहित्य वाटप केले गेले आहे. आतापर्यंत हजारो दिव्यांग व्यक्तींना ही उपकरणे मिळाली आहेत.