
प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वित्तीय समावेशन संपृक्तता मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रणी जिल्हा बँक कार्यालय कोल्हापूर आणि राधानगरी व भुदरगड तालुक्यातील बँकांनी सहभाग घेतला. राधानगरी व गारगोटी येथे वित्तीय समावेशन संपृक्तता मेळावे आयोजित करण्यात आले होते. आरबीआयचे मॅनेजर विशाल गोंडके यांनी मान्यवरांचे स्वागत व सूत्र संचालन केले. या शिबिरात विविध वित्तीय समावेशन बँकिंग योजनांची माहिती व मोहिमेचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक संदीप कुमार यांनी भारत सरकारने सुरु केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्त्व स्पष्ट केले. कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न कमी असलेल्या लोकांसाठी या योजना सुरु करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक विकास, दारिद्रय निर्मूलन, जीवनमान उंचावणे आदी आर्थिक समावेशनामागील उद्दिष्टे त्यांनी मांडली. तसेच अटल पेन्शन योजना (APY) ही असंघटित कामगार, शेतकरी व अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी महत्त्वाची पेन्शन योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. कुमार यांनी री-केवायसी (Re-KYC) चे महत्त्व अधोरेखित करताना, खाते सक्रिय ठेवण्यासाठी बँकांच्या मागणीनुसार व ठराविक कालावधीनंतर री-केवायसी सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात न अडकता सतर्क रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. विविध प्रकारच्या फसवणूक प्रकारांची माहिती देखील उपस्थितांना देण्यात आली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यावस्थापक डॉ. ज्योती सक्सेना यांनी आर्थिक समावेशन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून प्रत्येक घरातील व्यक्ति बँकिंग व केंद्रीय शासकीय योजनांच्या कक्षेत आली पाहिजे. डिजिटल व्यवहार, सामाजिक सुरक्षा योजना याबाबत ग्रामस्थांनी अधिकाधिक माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
आय डी बी आय बँकेचे महाव्यवस्थापक विक्रम भिडे व बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक श्रीमती के दुर्गा यांनी शिबिरार्थिना सामाजिक सुरक्षा योजना बाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी प्रत्येक व्यक्तीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण घ्यावे, असे आवाहन केले.
बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक बिस्वजीत गुहा यांनी खात्यांच्या री-केवायसी (Re-KYC) चे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, बँकांना केवायसी न सादर केल्यास त्याचे परिणाम ग्राहकांना भोगावे लागू शकतात. ठराविक कालावधीनंतर नियमानुसार केवायसी कागदपत्रे उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यावस्थापक हर्ष राजपाल यांनी डिजिटल फसवणुकीबाबत जनजागृती केली. अलीकडच्या काळात बँकिंग क्षेत्रात अनेक फसवणूक व सायबर गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खातेधारकांना तोटा सहन करावा लागला आहे असे सांगून बँकिंग क्षेत्रात घडणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणूक व गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.
बँक ऑफ इंडिया, कोल्हापूरचे झोनल मॅनेजर पुनीत द्विवेदी यांनी कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार मानले. त्यांनी विशेषतः संदीप कुमार, मुख्य महाव्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, डॉ. ज्योती सक्सेना, उपमहाव्यवस्थापक आरबीआय मुंबई, बिस्वजीत गुहा, उपमहाव्यवस्थापक बँक ऑफ इंडिया, हर्ष राजपाल, उपमहाव्यवस्थापक एसबीआय, के. सुनीता दुर्गा, उपमहाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच विक्रम भिडे, महाव्यवस्थापक आयडीबीआय बँक आणि केडीसीसी बँकेच्या अधिकारी श्रीमती खामकर यांचे आभार मानले. याशिवाय, त्यांनी बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक, कोल्हापूर मंगेश पवार व बँक ऑफ इंडिया वित्तीय समावेशन विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गोंडे यांचेही विशेष आभार व्यक्त केले.