
प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा गांधीजी नवविचारमंच यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा, सन्मानाचा महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार कोल्हापूरमधील ज्येष्ठ पुरोगामी शिक्षक नेते भरत रसाळे आणि गोव्यातील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांना जाहीर झाला असून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त गुरुवार दि. 2 ऑक्टोंबर, 2025 रोजी दुपारी 1:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि निमंत्रक प्रा. टी. के. सरगर आणि अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिली.
रोख पाच हजार रुपये, गांधी टोपी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप असून ज्येष्ठ समाजवादी नेते भरत लाटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास दिग्दर्शक आणि प्रकाशक अनिल म्हमाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भरत रसाळे यांनी गेली 40-45 वर्षे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे ते राज्याध्यक्ष राहिले आहेत. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची ही त्यांनी निर्मिती केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक मंडळाचे ते उपसभापती होते. सत्यशोधक शिक्षक मंडळ, समाजवादी अध्यापक सभा, राष्ट्र सेवा दल अशा विविध पातळीवरती शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक लढाऊ शिक्षक नेता म्हणून भरत रसाळे यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रासह देशभर त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे त्यांना राज्य व देश पातळीवरील तीसहून अधिक मानाचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या भरीव योगदानाची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांचे मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान आहे. गांधीवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यात त्याचे दखलपात्र योगदान राहिले आहे. शंभरहून अधिक ग्रंथ त्यांच्या नावे आहेत. गोव्यातील गोमंतकीय भाषेवर त्यांनी समीक्षात्मक काम केले आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील साहित्यिक संबंधावरील त्यांचे लेखन महत्वपूर्ण राहिले आहे. देशभर गांधीवादी प्रबोधनकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनाही राज्य आणि देशपातळीवरील पन्नासहून अधिक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिले आहेत.
भरत रसाळे, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांना महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यामुळे साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.
पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे, अर्हंत मिणचेकर, अनुराग शिंदे, धम्मदीप मस्के, अभिजीत मासुर्लीकर उपस्थित होते.