नवरात्रोत्सवात लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन दक्ष राहावे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

0
36

प्रतिनिधी जानवी घोगळे

साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख दैवत असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. अंबाबाईचे नवरात्र हे कोल्हापुरातील लोकोत्सव मानले जाते. रोज नव्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, धार्मिक विधी, वेदोक्त मंत्रोच्चार आणि लाखो भाविकांची दर्शनासाठीची उपस्थिती – हेच या उत्सवाचे वैशिष्ट्य.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून येणारे भाविक मंदिर परिसरात प्रचंड गर्दी करतात. मात्र, भाविकांच्या या वाढत्या गर्दीकडे देवस्थान समिती व प्रशासनाने योग्य ती सुरक्षा उपाययोजना केली आहे का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उपस्थित केला आहे.

भ्रष्टाचार व रखडलेली कामे

महालक्ष्मी मंदिरातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असूनदेखील, भाविकांसाठी शौचालये, स्वच्छता व्यवस्था, महिला भाविकांसाठी मूलभूत सोयीसुविधा यांची वानवा आहे. देवस्थान समितीतील विविध भ्रष्टाचार प्रकरणे चव्हाट्यावर आली असून त्यामुळे भाविकांच्या भावनांचा अनादर झाल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

सध्या मंदिर परिसरात सुरू असलेली कामे ही अपुरी व अर्धवट स्थितीत आहेत.

  • मणिकर्णिका कुंडाचे रखडलेले काम
  • गरुड मंडपाच्या कामातील मोठे अवजड खांब अर्धवट स्थितीत ठेवलेले
  • नगारखान्याचे सुरू असलेले अपूर्ण काम

या सगळ्या अपुऱ्या कामांच्या पार्श्वभूमीवर जर लाखो भाविक गर्दीतून पालखी सोहळ्यात चिंचोळ्या मार्गावरून गेले, आणि कुठलाही अनुचित प्रकार घडून जीवितहानी झाली, तर यासाठी देवस्थान समिती तसेच अध्यक्ष म्हणून मा. जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला आहे.

शिवसेनेचा इशारा

शिवसेना उपनेते संजय पवार व सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी स्पष्ट केले की –

“महालक्ष्मी मंदिरातील रखडलेली कामे, हलगर्जीपणा आणि भाविकांसाठी असलेल्या सोयींची कमतरता यामुळे जर भाविकांच्या जीवितास धोका निर्माण झाला, तर देवस्थान समिती जबाबदार राहील. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण करण्यासाठी शिवसेना प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाशी दोन हात करेल. शासनाने याची दखल घेऊन तातडीने सुरक्षा व सुविधा याविषयी कठोर पावले उचलावीत, अन्यथा होणारा जनआक्रोश प्रशासनाला सामोरा जावा लागेल.”

मागणी

शासनाने तातडीने देवस्थान समितीला कठोर सूचना निर्गमित करून –

  • भाविकांच्या सुरक्षिततेसंबंधी पक्की व्यवस्था करणे
  • रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करणे
  • मूलभूत सुविधा उपलब्ध करणे

या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे मत आहे.
✍️ संजय पवार – उपनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
✍️ विजय देवणे – सहसंपर्कप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here