
प्रतिनिधी :जानवी घोगळे
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्साहपूर्ण प्रतिसाद
कोल्हापूर : पांडुरंग फिरींगे प्रतिनिधी — “शाश्वत विकास आणि सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अपरिहार्य आहे. निरीक्षण, श्रवण, लेखन आणि अभ्यास यांच्या माध्यमातून नवसंशोधकांनी कौशल्यवृद्धी करून समाजाला सक्षम करावे,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरेचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी केले.
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (पुणे व मुंबई सेक्शन) आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन, डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्स अँड सिक्युरिटी’ या तीनदिवसीय परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
दक्षिण महाराष्ट्रातील अशा स्वरूपाची ही पहिलीच परिषद असून सात देशांतील तब्बल १०८९ संशोधकांचे शोधनिबंध प्राप्त झाले आहेत.
डॉ. काळे म्हणाले, “जिओ-स्पेशल सेन्सर आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे डिजिटलायझेशन आणि सुरक्षेचे नवे युग सुरू झाले आहे. क्वांटम की डिस्ट्रिब्युशन तंत्रज्ञानामुळे सुरक्षित संवादप्रणाली शक्य झाली आहे.” त्यांनी अत्याधुनिक वैज्ञानिक बदल व त्यांचे सामाजिक उपयोग यावर सविस्तर भाष्य केले.
संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने डिजिटल जगाची व्याख्या बदलली आहे. पारदर्शकता आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी जागरूकता अत्यावश्यक आहे.”
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू व आयईईई कॉम्प्युटर सोसायटी, पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. राजेश इंगळे यांनी संशोधनातील संवाद आणि प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
निवडक संशोधनप्रबंधांचे पुस्तक या वेळी प्रकाशित करण्यात आले.
आयईईई पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. अमर बुचडे म्हणाले, “ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे आरोग्य, शिक्षण, औषधनिर्माण आणि कायदा क्षेत्रात डेटा सुरक्षित ठेवणे शक्य झाले आहे.”
डॉ. विनित कोटक यांनी संशोधन आणि सामाजिक विकास यातील परस्परसंबंध स्पष्ट केले.
परिषदेचे अध्यक्ष आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “ज्ञान आणि कृती यांची सांगड समाजाला चालना देते. संशोधकांनी तंत्रज्ञानातून विश्वशांतीचा ध्यास घ्यावा.”
या वेळी जपान सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातील डॉ. वैभव मेहता, ऑस्ट्रेलियातील पर्थ विद्यापीठातील डॉ. विद्यासागर पोतदार, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, तसेच विविध संस्थांचे प्राचार्य, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
परिषदेच्या समारोपावेळी प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानले.

