
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अविनाश काटे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवमुद्रा प्रतिष्ठान, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ३:०० वाजता पंचगंगा नदी घाट परिसरात ५१ हजार पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सवाला सुरुवात होईल. मान्यवरांच्या हस्ते प्रथम दीपप्रज्वलन करून या दिव्य सोहळ्याची सुरुवात होणार आहे.

या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ७:०० वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रांगोळी प्रदर्शन, कराओके सादरीकरण, भक्तीगीतांचा कार्यक्रम, भव्य आतिशबाजी तसेच प्राचीन मंदिरांवर रंगीत विद्युत रोषणाई अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
या दीपोत्सवामुळे पंचगंगा घाट परिसर दिव्य तेजाने उजळून निघणार असून, कोल्हापूरकरांसाठी हा एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानीचा सोहळा ठरणार आहे.

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दिपक देसाई यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा दीपोत्सव हा कोल्हापूरच्या ओळखीचा अविभाज्य भाग झाला आहे. यावर्षी अधिक भव्य स्वरूपात हा सोहळा साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.


