माझ्या जडणघडणीत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजचा मोलाचा वाटा — नामदार राजेश क्षीरसागर

0
37

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

“माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि जडणघडण देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्येच झाली. या महाविद्यालयाने मला केवळ शिक्षणच दिले नाही, तर आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक भान आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी दिली. आज मी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, त्यामागे माझ्या महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे,” असे गौरवोद्गार नामदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित “माजी विद्यार्थी ऋणानुबंध स्नेहमेळाव्या”त प्रमुख पाहुणे आणि माजी विद्यार्थी म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले, “महाविद्यालयात व्यतीत केलेला काळ माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. इथेच मी घडलो, वाढलो, आणि जीवनमूल्यांची शिदोरी मिळवली. त्या ऋणातूनच मी महाविद्यालयाला दहा लाख रुपयांची देणगी अर्पण करतो.”कार्यक्रमात बोलताना डॉ. विश्वनाथ मगदूम म्हणाले की, “संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी नवीन शिक्षण धोरणानुसार गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण प्रगती साधली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, आरोग्य या क्षेत्रांसोबतच विदेशी भाषा आणि योग यासारख्या नव्या विषयांतही शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.”माजी प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाला एक लाख रुपयांची देणगी दिली. त्यांनी या रकमेच्या व्याजातून दरवर्षी “आदर्श विद्यार्थी” उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी सांगितले की, “1957 मध्ये स्थापन झालेले आपले महाविद्यालय हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले वाणिज्य शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. सीए फाउंडेशन, सेंटर ऑफ एक्सलन्स, प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, बीबीए आणि एमबीए कोर्सेस या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते. आज कोल्हापूर जिल्ह्यातील 70% पेक्षा जास्त चार्टर्ड अकाउंटंट हे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.”या प्रसंगी डॉ. एस. बी. पाटील, डॉ. ए. एम. गुरव यांनी मनोगते व्यक्त केली. माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रमोद जगताप, अनिरुद्ध भुरके, मनिष झंवर, फटाले आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि पुढील माजी विद्यार्थी मेळावा डिसेंबर 2026 मध्ये घेण्याचे ठरले.या कार्यक्रमाला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, डॉ. प्रसाद मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य उत्तम पाटील, सौ. पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, एस. जे. फराकटे, प्रा. वंडकर तसेच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, फोटोपूजन आणि संस्थागीताने झाली. दुसऱ्या सत्रात माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम तर तिसऱ्या सत्रात कलाविष्कार सादर झाले.सूत्रसंचालन डॉ. राज बिरजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुप्रिया चौगुले यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here