
प्रतिनिधी : जानवी घोगळे
मुंबई , ११ नोव्हेंबर : मुंबईतील वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘भाजपा महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा प्रभारी बैठक’ संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची प्रभावी रणनीती, जनसंपर्क मोहिमा, तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मोजके दिवस हातात असल्याने जिल्हा प्रभारी आणि स्थानिक नेत्यांनी जीव तोडून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक मजबूत करून नागरिकांपर्यंत विकासाचा अजेंडा प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्रीमंडळातील मान्यवर व राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा प्रभारी मान्यवर उपस्थित होते.

