
उचगाव (ता. करवीर) येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने इमारतीला चिकटून असणाऱ्या तारा ब्रॅकेट लावून रस्त्याच्या मध्यभागी घेताना कर्मचारी.
प्रतिनिधी : जानवी घोगळे
उचगाव : सार्थक वळकुंजे या सोळा वर्षीय मुलाचा विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला; या पार्श्वभूमीवर ‘विज बिलासाठी तगादा; पण ग्राहकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष’ या शीर्षकाची बातमी दैनिक पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर वीज वितरण कंपनीला जाग आली. या कंपनीने येथील इमारतीला असणाऱ्या ताराबाबत उपाययोजना सुरू केली. ११ हजार केव्हीच्या विजेच्या तारा ब्रॅकेट लावून मध्यभागी घेण्याचे काम वीज वितरण कंपनीने सुरू केले.

सार्थक च्या मृत्यूनंतर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या हाय व्होल्टेज तारा ब्रॅकेट लावून मध्यभागी घ्याव्या; अन्यथा आंदोलन करू असा इशारा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव व त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी दिला होता. त्यानंतर वीज वितरण कंपनीने या कारण ब्रॅकेट लावण्याचे काम सुरू केले. या तारा रस्त्याच्या मध्यभागी घेतल्या. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेला बळकटी आली. विजेच्या तारा मध्यभागी घेतल्याने ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले.

