
कोल्हापूर हॅलो प्रभात: पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या आर्ट्स–कॉमर्स विभागाने मोरजाई पठारावर ‘जैवविविधता अभ्यास व प्लास्टिक कचरा संकलन’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवला. सह्याद्री पर्वतरांगांमधील रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जैवविविधतेने समृद्ध पठारावर विद्यार्थ्यांनी अभ्यासासह स्वच्छतेचा आदर्श घालून दिला.
या उपक्रमात ११वीतील ४१ विद्यार्थी व शिक्षक–कर्मचारी सहभागी झाले. पर्यावरण विषय शिक्षक श्री. अनिल धस यांनी विद्यार्थ्यांना मोरजाई पठाराची वैशिष्ट्ये, पर्यावरणीय महत्व व वाढते प्रदूषण याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरातील वनस्पती, प्राणी, पक्षी, किटक यांचा सखोल अभ्यास करत नैसर्गिक अधिवासातील बदलांची नोंद घेतली.
प्रदूषण नियंत्रणाच्या हेतूने विद्यार्थ्यांचे १० गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटाने ठराविक मार्गावर फिरत झाडाझुडपात टाकलेला कचरा गोळा केला. या मोहिमेत सुमारे ३० किलो प्लास्टिक कचरा जसे पाण्याच्या बाटल्या, अन्नवेष्टन, पिशव्या, टोपल्या, चपला, पेले इत्यादी संकलित करण्यात आले—ही मोरजाई पठारासाठी महत्त्वपूर्ण स्वच्छता मोहीम ठरली.
या उपक्रमाचे नियोजन विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. थोरात यांचे सहकार्य लाभले. तसेच श्री. पी.वाय. राठोड, प्रा. सौ. एस.एन. ढगे, प्रा. सौ. एन.एस. पाटील, श्री. ए.आर. धस, श्री. संतोष कोले, स्टाफ सेक्रेटरी श्री. बी.एस. कोळी आणि सर्व शिक्षक–कर्मचारी यांनी उपक्रम यशस्वी केला.
👉 विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी दाखविलेली बांधिलकी कौतुकास्पद ठरली आहे.

