
एसपी नाईन प्रतिनिधी: प्रा मेघा पाटील
पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात आयोजित *नैसर्गिक शेती विषयक परिषदेत* मार्गदर्शन केले. या परिषदेत नैसर्गिक शेतीचे वैज्ञानिक आधार, त्याची अंमलबजावणी आणि शाश्वत शेतीपद्धतीमुळे होणारे फायदे यावर सविस्तर चर्चा झाली.या प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकस चंद्र रस्तोगी, ADF विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनवरे, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, गुजरातमधील नैसर्गिक शेतीविषयक तज्ञ, कृषी वैज्ञानिक, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, संशोधक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या भाषणात नैसर्गिक शेती ही केवळ पर्याय नसून भविष्यातील अनिवार्य गरज असल्याचे सांगितले. रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमीन, पाणी आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी नैसर्गिक शेतीच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, गुजरातमधील आदिवासी भागात नैसर्गिक शेतीद्वारे झालेले यशस्वी प्रयोग, उत्पादनात झालेली वाढ आणि शेतकऱ्यांचे बदललेले आर्थिक चित्र त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यात नैसर्गिक शेतीचा प्रसार वाढवण्यासाठी नव्या योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

कृषी वैज्ञानिकांनी नैसर्गिक शेतीतील बियाणे संरक्षण, मृदासंवर्धन, पिकांचे रोगनियंत्रण, जैविक इनपुट्स यावर सादरीकरण केले.विद्यार्थी, संशोधक आणि अधिकारी यांनी नैसर्गिक शेतीतील नव्या तंत्रज्ञानावर चर्चा करत शंकांचे निरसन केले. परिषदेतून शाश्वत शेतीपद्धती राज्यभर व्यापक प्रमाणात राबविण्याचा संकल्प करण्यात आला.ही परिषद शेतकरी व कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरली.


