
एस पी नाईन प्रतिनिधी प्रा मेघा पाटील
निसर्गग्राम, येवलेवाडी येथे आठवा निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

पुणे : राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे यांच्या वतीने येवलेवाडी येथील निसर्गग्राम येथे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आठवा *निसर्गोपचार दिन* उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी निसर्गोपचार शास्त्राशी संबंधित पुस्तकांचे तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेली महाविद्यालये, निसर्गोपचार क्षेत्रातील वैद्यकीय व्यवसायी, तसेच उत्कृष्ट विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पोस्टमास्तर जनरल सुचिता जोशी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे यांचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.निसर्गोपचार क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच देशभरातील निसर्गोपचार वैद्यकीय व्यवसायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


