प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती विभागामार्फत 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' ही विशेष मोहीम सुरु करण्यात येत आहे. ही मोहीम 19 नोव्हेंबर पासून मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण तसेच हवामान अनुकूल स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबविण्यात येतील. उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालये यांचा अंतिम टप्प्यात विशेष गौरव करण्यात येणार आहे. 10 डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर केले जातील. या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.

