
SP-9 प्रतिनिधी प्रा.मेघा पाटील
कोल्हापूर :रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. प्रगती खरे चव्हाण यांनी आज एस.पी. नाईन मराठी माध्यम समूहाला सदिच्छा भेट देत संस्थेच्या सामाजिक–राजकीय उपक्रमांची प्रशंसा केली. माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांच्यासोबत त्यांनी विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी चॅनलतर्फे त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश वरिंगे, तसेच उद्योजक केतन मोहिते उपस्थित होते.महिलांचे नेतृत्व आणि एकजूट… बदलाची खरी सुरुवात – डॉ. चव्हाण महिलांवर वाढत चाललेले अन्याय-अत्याचार आणि समाजातील असुरक्षितता लक्षात घेता महिलांनी पुढे येऊन संघटित होण्याची आज तीव्र गरज असल्याचे मत डॉ. प्रगती खरे चव्हाण यांनी व्यक्त केले.त्या म्हणाल्या—“महिला नेतृत्व आणि एकी हीच खरी क्रांतीची सुरुवात आहे. घरातून आणि समाजातून होणारा विरोध, मानसिक त्रास, ताणतणाव सहन करत आम्ही महिलांसाठी लढतो आहोत. आम्ही भोगले ते माझ्या आया-बहिणींनी आणि लेकींनी भोगू नये, म्हणून हा संघर्ष आहे.”समाजातील प्रत्येक स्त्रीने दुसऱ्याची मुलगी म्हणजे माझीच मुलगी’या भावनेने उभे राहिले तर मुलींच्या सुरक्षिततेचे प्रश्न मार्गी लागू शकतात, असे मतही त्यांनी नोंदवले.त्यांनी महिलांमध्ये एकजूट नसल्याने अनेक लढ्यांना अपेक्षित यश मिळत नाही, याबाबत खंतही व्यक्त केली.“एकत्र या आणि संघर्ष करा… महिलांची एकीच सर्वात मोठी ताकद”डॉ. चव्हाण पुढे म्हणाल्या“मुलींची सुरक्षा, न्याय किंवा प्रतिष्ठा—प्रत्येक विषयावर महिलांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. महिलांची एकी हीच सर्वात मोठी ताकद आहे. समाजपरिवर्तनाचे बीज महिलांनीच रोवले पाहिजे.”स्वतः पुढे येऊन नेतृत्व स्वीकारणे, संघटनात्मक भेद मिटवणे आणि समाजातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीने अंगिकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

