
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, पालकांच्या आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाची गळचेपी होऊ नये, या उद्देशाने या परिसरात महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले यांनी केले.
श्रीपतराव चौगुले विधी महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी स्वागत समारंभात ते मार्गदर्शन करत होते. डॉ. चौगुले म्हणाले, “कायद्याचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी असंख्य करिअर संधी उपलब्ध करून देते. न्यायव्यवस्था, प्रशासन, कायदेशीर सल्ला सेवा, कॉर्पोरेट क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेऊन उज्ज्वल करिअर घडवावे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संपदा पिसे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील व श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी उपस्थिती दर्शविली.
समारंभाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. विद्यार्थ्यांचे स्वागत डायरी व पेन भेट देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. प्रियांका पाखरे यांनी तर आभार प्रतिज्ञा सुतार यांनी मानले. शिक्षकवर्ग, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : विद्यार्थी स्वागत समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. के. एस. चौगुले; समवेत शिवाजीराव पाटील, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. संपदा पिसे व मान्यवर.

