दत्त जयंती नवरात्रोत्सवात ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचे स्मरण : स्वातंत्र्याचा महामंत्र पुन्हा जागृत करण्याचा संदेश-वंदूर,


वंदूर ता. … (प्रतिनिधी)गावातील श्री दत्त मंदिरामध्ये सुरू असलेल्या दत्त जयंती नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज, रविवार ३० रोजी ‘वंदे मातरम्’ या स्वातंत्र्याच्या महामंत्राला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी एडवोकेट सीमा विशाल काशीद-हेरले यांनी भावपूर्ण व विचारप्रवर्तक व्याख्यान दिले.आपल्या व्याख्यानात त्यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचे इतिहासातील महत्त्व सविस्तर उलगडून सांगितले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या महामंत्रामुळे देशभरात क्रांतीची ज्वाला पेटली आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी “वंदे मातरम्” असा जयघोष करत आपल्या प्राणांचे बलिदान देशमातेच्या चरणी अर्पण केले, असे त्यांनी नमूद केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी या गीताने दिलेली प्रेरणा अमूल्य असल्याचे सांगून आजच्या तरुण पिढीनेही ‘वंदे मातरम्’ या विचारांचे आत्मसात करून देशाला नव्या आणि प्रगत भविष्यात नेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या पूजनाने करण्यात आली. गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते हे पूजन संपन्न झाले. त्यानंतर व्याख्यान झाले आणि संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी उभे राहून एकत्रितपणे ‘पूर्ण वंदे मातरम्’चे गायन केले. या घोषात संपूर्ण मंदिर परिसर राष्ट्रप्रेमाच्या भावनेने दुमदुमून गेला.या प्रसंगी बागणे सर, एडवोकेट सुधीर जोशी, वंदुरकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून असे उपक्रम तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.दत्त जयंती नवरात्रोत्सवातील हा कार्यक्रम केवळ धार्मिकच नव्हे, तर राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

