कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : जालना येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेछुट लाठीमार केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या ‘ कोल्हापूर शहर’ बंदला आज, मंगळवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
बंद दरम्यान शहरातील सर्व व्यवहार बंद ठेऊन व्यापारी, व्यावसायिकांनी पाठींबा दिला.
कोल्हापूर बंदची हाक काल, सोमवारी देण्यात आली होती. बंदमध्ये मराठा समाजातील विविध संघटनांसह भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून सर्व कार्यकर्ते ऐतिहासिक दसरा चौकात जमायला सुरवात झाली. कार्यकर्त्यांनी शहरभर फिरुन बंदचे आवाहन करत फिरण्याची तयारी केली होती. परंतु बंदला कसलेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना दसरा चौकातच थांबण्याचा आग्रह धरला.
कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद पाळून जालना येथील घटनेचा निषेध नोंदविला. या बंदमध्ये व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाले, टपरीचालक, छोटे विक्रेते, रिक्षा व्यावसायिकही सहभागी झाले.
महापालिकेच्या शाळांना बंदच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली तर खासगी शाळातील कामकाजही बंद राहिले. रिक्षा वाहतुक बंद राहिल्याने वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती.
कोल्हापुरातून निघणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. केएमटी ही शहर बस वाहतुकही सकाळनंतर बंद ठेवण्यात आली.