
‘गोकुळ हा राज्याचा अधिकृत दुधाचा ब्रँड ठरावा’ – नाम. हसन मुश्रीफ
मुंबई प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वाशी, नवी मुंबई येथील १५ मेट्रिक टन क्षमतेच्या अत्याधुनिक दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे मुंबई बाजारपेठेत गोकुळची उत्पादन आणि वितरण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.उद्घाटनप्रसंगी मंत्री मुश्रीफ म्हणाले, “गोकुळने गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर राज्यातील अग्रगण्य दुग्धसंघ म्हणून ओळख निर्माण केली आहे. या संघाच्या परंपरा, उत्पादन क्षमता आणि ग्राहकवर्ग पाहता ‘गोकुळ’ हा राज्याचा अधिकृत दुधाचा ब्रँड घोषित होणे आवश्यक आहे.” त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध संकलन वाढवण्याची, तसेच सरकारने दूध उत्पादकांसाठी अनुदान धोरण राबवण्याची गरज असल्याचे सांगितले.आमदार सतेज पाटील म्हणाले, “गेल्या चार–पाच दशकांपासून ‘गोकुळ’ने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत विश्वास निर्माण केला आहे. आधुनिक पॅकेजिंग, नवनवीन उत्पादने आणि गुणवत्तेवर भर देत गोकुळ आता नवीन बाजारपेठेत दमदार पाऊल टाकत आहे. हा प्रकल्प म्हणजे शेतकरी कुटुंबांच्या भविष्याची गुंतवणूक आहे.”गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, सहा कोटी रुपयांत उभारलेला हा दही प्रकल्प गोकुळच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा असून, महिन्याला जवळपास २५ लाखांची बचत संघाला होणार आहे. “गुणवत्तेला प्राधान्य देत गोकुळ लवकरच आईस्क्रीमसारखी नवीन उत्पादने देखील बाजारात आणणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी स्वागत करताना सांगितले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आणि संचालक मंडळाचे एकत्रित प्रयत्न यामुळे गोकुळ सातत्याने प्रगती करत आहे.उपस्थित मान्यवर :नाम. हसन मुश्रीफ, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, वाशी व्यवस्थापक दयानंद पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मुंबई परिसरातील वितरक व कर्मचारी उपस्थित होते.फोटो ओळ : दही उत्पादन प्रकल्पातील नवीन उत्पादनाचे अनावरण करताना मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ, विश्वास पाटील व अन्य मान्यवर.


