ZP शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या आता कायमच्या बंद; ‘पवित्र’द्वारे ३२ हजार शिक्षकांची भरती होणार

0
118

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महापालिकांमधील २३ हजार तर खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील आठ ते दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे. पवित्र पोर्टलवर सध्या नावनोंदणी सुरु असून आता नवनियुक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली कायमची बंद होणार आहे.

त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना तसे संमतिपत्र द्यावे लागणार आहे.

डी.एड, बी.एडनंतर टेट, टीईटी उत्तीर्ण होऊनही चार ते पाच लाख उमेदवारांना शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आता प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून ‘पवित्र’ पोर्टलद्वारे सर्वच शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरती प्रक्रिया सुरु झाल्याने ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुका देखील थांबविण्यात आल्या आहेत.

ऑक्टोबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आता आंतरजिल्हा बदल्यानंतर कोकणसह इतर विभागांमध्ये वाढलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या बदल्यांची पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तीन वर्षाला होणार जिल्हाअंतर्गत बदल्या
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या प्रत्येक तीन वर्षाला जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या होतात. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी गतवर्षीपासून या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला.

पण, आता विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून गुणवत्तेवर कोणताही परिणाम होवू नये म्हणून आंतरजिल्हा बदल्या (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) कायमच्या बंद केल्या आहेत. त्यासाठी संबंधितांना तसे लेखी संमती पत्र द्यावे लागणार आहे.

मात्र, जिल्हाअंतर्गत बदल्या तीन वर्षातून एकदा होतील, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना त्यानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here