कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : एस.टी.महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून पुण्यासह विविध जिल्ह्यात होणारी वाहतुक मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत बंद करण्यात आली होती.
यादरम्यान ७२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विभागाचे ३ लाख ६९ हजार ३८७ रुपयांचे उत्पन्न बुडाले. दुपारनंतर ही सेवा पुर्ववत करण्यात आली.
कोल्हापूर विभागातील १२ आगारातून पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, उत्तर कर्नाटक, कोकण आदी ठिकाणी रोज शेकडो फेऱ्या होतात. त्यातून हजारो प्रवासी विविध जिल्ह्यात प्रवास करतात.
मराठा आरक्षण आंदोलनाची धग जिल्ह्यात पोहचली . त्यामुळे विशेषत: कोल्हापूरातून पुुणे मार्गावरील प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसला. सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ७२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यात बहुतांशी कोल्हापूर-पुणे मार्गावरील २० बसेसचा समावेश होता.
या कालावधीत एकूणच १० हजार ८७७ किलोमीटरचे अंतर उपलब्ध बसेसद्वारे होवू शकले नाही. त्यामुळे एकूण ३ लाख ६९ हजार ३८७ रुपयांचा उत्पन्नात फटका बसला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर ही वाहतुक पुन्हा पुर्ववत करण्यात आली. याबाबतचे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आले होते.
त्यामुळे आंदोलकांकडून बसेसची तोडफोड होवू नये, याकरीता दक्षता म्हणून सकाळी ९ ते दुपारी दोन वाजेपर्यंत बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. दुपारनंतर वातावरण बघून सर्वच मार्गावरील बसेस आगारांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध बसेसची तोडफोड होवू नये, प्रवाशांना त्याचा फटका बसू नये, याकरीता सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या दुपारनंतर पुर्ववत केल्या आहेत. – संतोष बोगारे, विभागीय वाहतुक अधिकारी, एस.टी.कोल्हापूर विभाग.