
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलावात शनिवारी (दि. 13) दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस व अग्निशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामन दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासणीनंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शेंडा पार्क येथील शवविच्छेदन गृहात हलविण्यात आला आहे.
सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिचे वय अंदाजे मध्यमवयीन असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना अपघाती बुडून मृत्यूची आहे की आत्महत्या अथवा अन्य कोणता प्रकार आहे, याबाबत उत्तरीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या वतीने पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरविलेल्या व्यक्तींच्या तक्रारी तसेच नागरिकांकडून माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे रंकाळा परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही अफवा पसरवू नये, तसेच मृत महिलेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

