कोल्हापूर हादरले! प्रसिद्ध दंतचिकित्सकाची राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या

0
94

“माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल…” शेवटचा मेसेज वाचून पोलिसही स्तब्ध

कोल्हापूर | प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील एक प्रसिद्ध दंतचिकित्सकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. डॉ. अवधूत प्रकाश मुळे (वय ३९) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. राजाराम तलावात उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पाठवलेला शेवटचा व्हॉट्सॲप मेसेज आणि मृत्यू निश्चित करण्यासाठी केलेली तयारी पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

नेमकी घटना काय?

डॉ. अवधूत मुळे हे मूळचे जयसिंगपूर येथील रहिवासी असून ते कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात आले. तलावाच्या काठावर त्यांनी आपली दुचाकी लावली. त्यानंतर त्यांनी पाठीवरील सॅकमध्ये दगड व विटा भरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शरीर पाण्यावर तरंगू नये, यासाठी त्यांनी ही तयारी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी राजाराम तलावात उडी घेतल्याचे समोर आले आहे.

शेवटचा धक्कादायक मेसेज

आत्महत्येपूर्वी डॉ. मुळे यांनी आपल्या जवळच्या मित्रांना व नातेवाईकांना एक अत्यंत हृदयद्रावक व्हॉट्सॲप मेसेज पाठवला होता. त्या मेसेजमध्ये त्यांनी लिहिले होते –

माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल.”

हा मेसेज मिळताच मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी तातडीने शोधाशोध सुरू केली. याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली.

तलावाकाठी सापडली दुचाकी व सुसाईड नोट

राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तलावाच्या काठावर डॉ. मुळे यांची दुचाकी आढळून आली. दुचाकीवर ठेवलेली एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. या नोटच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
शनिवारी सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या पाठीवरील बॅगेत दगड भरलेले असल्याचे आढळून आले, त्यामुळे तो पाण्यावर तरंगला नव्हता.

आत्महत्येचे कारण काय?

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, डॉ. अवधूत मुळे हे गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून जात होते. त्यांचा घटस्फोट झाला होता. तसेच ते गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय प्रॅक्टिस करत नव्हते. या कारणांमुळे ते नैराश्यात (Depression) असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्वस्थतेतूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ

या घटनेमुळे जयसिंगपूर व कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एक सुशिक्षित, प्रतिष्ठित डॉक्टर अशा पद्धतीने जीवन संपवतो, ही बाब सर्वांसाठी धक्कादायक असल्याची भावना सहकारी डॉक्टर व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

राजारामपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून सुसाईड नोट व मोबाईलवरील मेसेजच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.
महत्त्वाची सूचना

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार करत असाल, तर तात्काळ तज्ज्ञांची मदत घ्या.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाईन – टेलिमानस: 14416 किंवा 1-800-891-4416 (24×7)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here