
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर : आर्थिक देवाण-घेवाण प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी संतोष पानकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांतील संशयास्पद कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची सखोल व पारदर्शक चौकशी करण्याची ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पानकर यांच्या व कुटुंबीयांच्या नावे तब्बल सात बँक खाती असून अल्प कालावधीत त्यावर प्रचंड रकमा जमा झाल्याची माहिती निवेदनातून समोर आली आहे. सुमारे ६० हजार रुपयांच्या मासिक वेतनावर असलेल्या कर्मचाऱ्याच्या खात्यात दीड वर्षात कोट्यवधी रुपये जमा होणे हे गंभीर व धक्कादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे पैसे कुठून आले, कोणाचे आहेत, याचा पर्दाफाश करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले.
निवेदनात असेही म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक आर्थिक घोटाळ्यांत गुंतवणूकदारांना आरोपी ठरवून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, तर खरे सूत्रधार मोकळे राहिले. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकारी व इतर संबंधितांमार्फत वसुली केल्याचे आरोपही करण्यात आले असून, यामुळे तपास संथ व अपारदर्शक राहिल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच इतर संशयित घटकांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी कडक मागणी करण्यात आली आहे. “प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून तपास झाला तर सर्व आर्थिक घोटाळे उघडकीस येतील,” असा ठाम विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

