
संपादक रत्नागिरी / मेघा कोल्हटकर
आधी घेतलेल्या माहितीप्रमाणे रत्नागिरी शहरांतील, पोमेंडी या ग्रामीण भागांत संपर्क साधून लोकनियुक्त महिला सरपंच, सौ. ममता जोशी यांची भेट घेतली. महिला सबलीकरण, सक्षमीकरण, भाषा संवर्धन, वाचनालयांची गरज अशा अनेक विषयावर चर्चा करता आली. दिलेल्या पत्रानुसार भेटीची ग्रामपंचायतीतून पोहोच मिळाली. त्यांनी एका बचत गटाच्या CRP [Community Resourse Person] संजना मुदगेकर यांचा संपर्क क्रमांक देत, एखाद्या दिवशी बचत गट मिटींगला हजर रहाण्याचे सुचवले, त्यांच्याशी माझा लगेचच संपर्क झाला. दुसरे दिवशी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान; ‘नक्षत्र महिला ग्रामसंघ’ आदर्श वसाहत, ता. जि. रत्नागिरी या बचत गटाची भेट घेतली. दुपारी दोन ते पाच अशी त्यांची मासिक भेटीची वेळ ठरलेली असते. महिन्यातून एक – दोन दिवस या सर्व महिला एकत्र येतात, तेथे पोहोचताच असे लक्षांत आले की, अनेक बचत गटांच्या प्रमुख मीटिंगसाठी उपस्थित आहेत. बचत गटाच्या परंपरेप्रमाणे त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. “हीच आमुची प्रार्थना” या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

त्या सगळ्या सखींशी संवाद साधताना अनेक व्यवसायांची माहिती मिळाली. त्यांच्यातील धाडस दिसून आले. “बचत गटांत येण्याआधी आर्थिक व्यवहार सांभाळताना आम्ही सर्वजणी घाबरत होतो, पण आता पैशांची देवघेव, चेक बँकेत भरणे या गोष्टी चांगल्या जमू लागल्या आहेत. व्यवसाय करताना कर्ज घेऊन वेळेत त्याची परतफेड करणे, एखाद्या व्यक्तीस अगदीच काही अडचण असेल तर बचत गट करत असलेले सहाय्य, आत्ता नवीन सभासद शांत असले तरी नंतर त्याही बोलू लागतात.” याची माहिती इतर सदस्यांनी दिली. या भेटीमध्ये ग्रामीण भागांमधले महिला सबलीकरण, सक्षमीकरण जाणवले. घरसंसारासाठी काहीतरी करतोय याचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर दिसत होता. या आयोजित कार्यक्रमामध्ये ‘निर्भया प्रेस वूमन असोसिएशन’ जो उपक्रम PRESS SP-9 माध्यमसमूह कोल्हापूर यांचेतर्फे सुरू आहे त्याची माहिती रत्नागिरी जिल्हा संपादक मेघा कोल्हटकर यांनी दिली. या कामामुळे महिलांची निर्माण होणारी वेगळी ओळख, ग्रामीण भागांतील कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, त्यासाठी कोल्हापूर व इतर शहरांतून टीम कशी कार्यरत आहे याचे त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम झाल्यावर नक्षत्र ग्रामसंघ बचत गट प्रतिनिधींनी पुनश्च टाळ्या वाजवून निरोप घेतला.

