महिला सबलीकरणातूनच शाश्वत ग्रामविकास – धनाजी गुरव

0
32

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे

महिला सबलीकरण म्हणजेच खऱ्या अर्थाने शाश्वत विकास होय. एकविसाव्या शतकात तांत्रिक प्रगती झाली असली तरी आजही इमारतींचे स्लॅब गळताना दिसतात; मात्र मधमाशीने तयार केलेली रचना इतकी परिपूर्ण असते की त्यामध्ये सूक्ष्म चूकही आढळत नाही. त्याच धर्तीवर महिलांचे सशक्तिकरण झाले पाहिजे. बचत गटांच्या माध्यमातूनच महिलांचे खऱ्या अर्थाने सबलीकरण घडते आणि आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी होते, असे प्रतिपादन आंबवडे गावचे आदर्श माजी सरपंच धनाजी गुरव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दिगवडे (ता. पन्हाळा) येथे आयोजित निवासी सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात “बचत गट व महिला सबलीकरण” या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
धनाजी गुरव पुढे म्हणाले की, हिवरे बाजारसारखे विकसित गाव बचत गटांच्या बळावर उभे राहिले आहे. त्यामुळे आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महिलांच्या बचत गटांचे सबलीकरण करणे काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंब, समाज आणि गावाचा विकास आपोआप साध्य होतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. कल्पनाताई चौगुले होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांच्या नेतृत्वक्षमतेवर भर देत बचत गट चळवळीचे सामाजिक महत्त्व विशद केले.
कार्यक्रमास डॉ. अजय चौगुले, सुनंदा शिंदे, अश्विनी पोवार, छाया पाटील, सगुना पोवार, सारिका पोवार, सुमन कुंभार, सुमन पाटील, विद्या कांबळे, उर्मिला पोवार, अर्चना जाधव, नंदिनी पाटील, अंबुताई पाटील, शारदा पोवार, रेश्मा पाटील, भाग्यश्री पोवार, वृषाली पोवार, विद्या चौगुले, लता पोवार, तेजस्विनी पाटील यांच्यासह बचत गटांच्या महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कु. किरण नरंदेकर, सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा पाटील, तर आभार कु. सानिका पाटील यांनी मानले. या व्याख्यानास सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📸 फोटो ओळ –
श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या दिगवडे येथील श्रमसंस्कार शिबिरात बचत गट व महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना धनाजी गुरव, समवेत डॉ. अजय चौगुले, सौ. कल्पनाताई चौगुले व उपस्थित मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here