बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात ठोस कारवाईची मागणी

0
9

हिंदू एकता आंदोलनकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे

बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या हल्ले, जाळपोळ, जबरदस्तीचे स्थलांतर, महिलांवरील अत्याचार आणि मंदिरे उद्ध्वस्त करण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, हिंदू एकता आंदोलनच्या वतीने भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, तसेच गरज भासल्यास बांगलादेशात हिंदू बहुल स्वतंत्र राष्ट्र निर्मितीचा पर्याय विचाराधीन घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन आज मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सादर करण्यात आले. हे निवेदन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बांगलादेशात हिंदूंना योजनाबद्ध पद्धतीने लक्ष्य केले जात असून त्यांचे जीवन, धर्म, मालमत्ता आणि सन्मान सुरक्षित राहिलेला नाही. स्थानिक प्रशासन व शासनयंत्रणा या अत्याचारांना रोखण्यात सातत्याने अपयशी ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बांगलादेशातील हिंदूंना तेथील कट्टर मानसिकतेतून “भारतीय” समजून लक्ष्य केले जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.
हिंदू एकता आंदोलनाने भारत सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत :
बांगलादेश सरकारवर कठोर राजनैतिक दबाव टाकून हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवावेत,
संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मंचांवर बांगलादेशातील हिंदू नरसंहाराचा मुद्दा अधिकृतपणे मांडावा,
अत्याचारग्रस्त हिंदू कुटुंबांचे संरक्षण, पुनर्वसन आणि सन्मानपूर्वक जीवनासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात,
आणि जर बांगलादेश शासन हिंदू समाजाचे संरक्षण करण्यात सातत्याने अपयशी ठरत असेल, तर बांगलादेशचे विभाजन करून हिंदू बहुल स्वतंत्र राष्ट्र निर्मितीचा पर्याय गंभीरपणे विचाराधीन घ्यावा.


ही मागणी कोणत्याही द्वेषातून नसून, बांगलादेशातील हिंदू समाजाच्या अस्तित्व रक्षणासाठी आणि सुरक्षित, सन्मानपूर्ण जीवनाच्या हक्कासाठी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दीपक सुरेशराव देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये विलास मोहिते, गजानन तोडकर, बापू वडगावकर, हिंदुराव शेळके, पांडुरंग कदम, मनोहर स्वरूप, संदीप सासणे, पूजाताई शिंदे, ऐश्वर्या मुनीश्वर, बाबू साखळकर, प्रतीक डिसले, किशोर घाडगे, कैलास दीक्षित, किशोर पठारकर, सचिन माळी, पियुष कलडोने, ऋतुराज बर्गे, आशिष लोखंडे, नागेंद्र उगार, जयवंत खतकर, सतीश वेताळे, प्रदीप मोहिते, महेश इंगवले आणि विक्रमसिंह जरग यांचा समावेश होता.
भारत सरकारने या गंभीर व संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन निर्णायक पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here