
प्रतिनिधी : जानवी घोगळे
‘नाईट कट्टा आळवे’च्या व्हिजन ग्रीन आळवे 2025 उपक्रमातून निसर्गसंवर्धनाची लोकचळवळ
आळवे (ता. पन्हाळा) | प्रतिनिधी-( सरदार गायकवाड( हवालदार ) फोटोग्राफर
नवीन वर्षाची सुरुवात केवळ उत्सवापुरती न ठेवता निसर्गासाठी काहीतरी देण्याचा निर्धार करत नाईट कट्टा आळवे या निसर्गप्रेमी ग्रुपने “व्हिजन ग्रीन आळवे 2025” हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे.
“एक वाढदिवस – एक झाड” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवत गावकऱ्यांच्या सहभागातून उभी राहिलेली ही चळवळ आज संपूर्ण आळवे गावासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
शिवरायांच्या विचारांतून समाज व निसर्गसेवा
नवीन वर्ष व शिवजयंतीचे औचित्य साधून शिवरायांच्या विचारांचा जागर करत या ग्रुपकडून रक्तदान शिबिर, गुणवंतांचा सत्कार, व्याख्यानमाला, कवी संमेलन अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून 2025 साली वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा उपक्रम सुरू करण्यात आला.
वाढदिवसातून निसर्गसेवा
या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त त्या व्यक्तीकडून रोप किंवा रोपांसाठी आर्थिक सहकार्य स्वीकारले जाते. दर रविवारी संबंधित वाढदिवस असलेल्या व्यक्तींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येते.
“एक दिवस – एक तास” ही भूमिका घेऊन ग्रुपचे कार्यकर्ते झाडांना पाणी देणे, तण काढणे, स्वच्छता करणे अशा कामांत सातत्याने सहभागी होत आहेत.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
वयोवृद्ध, महिला वर्ग, युवक, विद्यार्थी, तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे ग्रामस्थही रोपे, आर्थिक मदत व विविध स्वरूपात सहकार्य करत आहेत.
कार्यक्रमात भेट म्हणून मिळालेली रोपे देखील ग्रुपकडे सुपूर्द करून “खारीचा वाटा” उचलण्याची भावना अनेकांनी दाखवली आहे.
पारदर्शक आर्थिक नियोजन
या उपक्रमासाठी मिळालेली
- एकूण जमा रक्कम : ₹49,483
- एकूण खर्च : ₹32,160
- शिल्लक : ₹17,323
शिल्लक रकमेचा वापर शाळेच्या सुशोभीकरणासाठी वृक्षलागवड तसेच आतापर्यंत लावलेल्या झाडांच्या संगोपनासाठी करण्यात येणार आहे.
विशेष सहकार्य व सामाजिक पाठबळ
अनेक व्यक्ती, अधिकारी, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत प्रशासन, रोपवाटिका तसेच विविध सेवाभावी व्यक्तींनी रोपे, आर्थिक मदत, टेम्पो सेवा, ठिबक साहित्य, मोठ्या प्रमाणात रोपे देऊन या उपक्रमास भक्कम पाठबळ दिले आहे.
2026 साठी नवे संकल्प
नवीन वर्ष 2026 निमित्ताने नाईट कट्टा आळवे ग्रुपने आणखी सामाजिक उपक्रमांचे संकल्प जाहीर केले आहेत.
- वयोवृद्ध नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडी व मिनी गार्डन
- वाढदिवस निमित्ताने पुस्तक देणाऱ्यांसाठी बुक बँक
- जमा होणाऱ्या लोकवर्गणीतून समाजोपयोगी उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी
निसर्गासाठी उभी राहिलेली लोकचळवळ
“आपण ज्या समाजात व निसर्गात राहतो, त्यासाठी काहीतरी देणे ही आपली जबाबदारी आहे” या भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता एक निसर्गविषयक लोकचळवळ बनत आहे.
नाईट कट्टा आळवेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आळवे गाव हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक होण्याच्या दिशेने नक्कीच एक पाऊल पुढे टाकत आहे.

