
पन्हाळा | प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
सामाजिक बांधिलकी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांचा गौरव म्हणून पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्कार श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाला जाहीर करण्यात आला आहे.चौगुले शिक्षण समूहाने गेल्या बावीस वर्षांपासून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीचा हात देत, विशेषतः विद्यार्थिनींच्या शिक्षणाची गरज ओळखून शैक्षणिक प्रगतीचा चढता आलेख कायम राखला आहे. दर्जेदार शिक्षणासोबत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने मिळवलेले नावलौकिक हे या पुरस्काराचे प्रमुख कारण ठरले आहे.

याआधीही विविध मानांकित पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या संस्थेचे संस्थापक डॉ. के. एस. चौगुले व सचिव शिवाजीराव पाटील यांनी लावलेले शैक्षणिक मूल्यांचे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. सध्या प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा प्रभावी उपयोग करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.
या प्रतिष्ठित पुरस्काराचे वितरण मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी कळे (ता. पन्हाळा) येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येणार आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम तसेच पत्रकार संघांचे संस्थापक पी. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाला मिळालेला हा सन्मान म्हणजे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या कार्याचा गौरव असून, सर्व स्तरांतून संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.


