शेतकऱ्यांची घरगुती वीज तोडू नका; कडेगाव-खानापूर तालुका शेतकरी संघटनेचा महावितरणला इशारा

0
29

प्रतिनिधी :शेतकरी संघटना

कडेगाव/विटा:
शेतकऱ्यांकडून १६ तासांचे वीज बिल घेऊन प्रत्यक्षात मात्र केवळ ८ तास वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने, अतिरिक्त घेतलेल्या बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या घरगुती वीज बिलात वर्ग करावी आणि तोपर्यंत शेतकऱ्यांची घरगुती वीज जोडणी तोडू नये, अशी मागणी कडेगाव आणि खानापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता पाटील साहेब यांना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी लेखी निवेदन दिले.
बिलाचा हिशोब चुकता करण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, वीज वितरण कंपनीने केंद्र सरकारकडून १६ तास वीज पुरवठा करण्याच्या नावाखाली निधी व बिल घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना शेतीसाठी केवळ ८ तास वीज पुरवण्यात आली. उर्वरित ८ तासांच्या पैशांचा हिशोब लावल्यास मोठी रक्कम महावितरणकडे शिल्लक आहे. ही शिल्लक रक्कम शेतकऱ्यांच्या थकबाकी असलेल्या घरगुती वीज बिलात वळती (Adjust) करून घ्यावी. जोपर्यंत हा हिशोब पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची घरगुती वीज कापली जाऊ नये, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.
शेतकऱ्यांचा संताप
सध्या शेतीसाठी वीज पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच महावितरणकडून घरगुती वीज तोडण्याची मोहीम राबवली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरणने सक्तीने वीज तोडणी थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी
यावेळी कडेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम माळी, खानापूर तालुका अध्यक्ष प्रदीप देवकर, सर्जेराव देवकर, माणिक जगताप, गोडाची वाडी शाखा अध्यक्ष संजय निकम, शिवाजी गोड, बबन गोड, उत्तम काटकर, विमल काटकर, तानाजी पाटणकर, विश्वास चव्हाण, पंढरीनाथ गोड, राजाराम चव्हाण आणि आनंदराव पाटणकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
“शेतकऱ्यांनी न वापरलेल्या विजेचे पैसे आधीच महावितरणकडे जमा आहेत. त्यामुळे घरगुती बिलासाठी शेतकऱ्यांच्या घरातला अंधार करणे अन्यायकारक आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here