
ऑलिम्पिकवीर खाशाबा
लेखक – प्रा. संजय दुधाणे
प्रतिनिधी : अविनाश घाटे
भारताला पहिले ऑलिम्पिक पदक पदक विजेते खाशाबा जाधव यांची 101 वी शतकोत्तर जयंती आज साजरी होत आहे. खाशाबांच्या जीवन चरित्र पुस्तकाचाही रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने लेखक संजय दुधाणे यांनी सांगितलेली ऑलिम्पिकवीर खाशाबा या पुस्तकाची यशोगाथा....
ऊनीपुरी 25 वर्ष सरली. पत्रकारिता पाठोपाठ यंदा खाशाबा जाधव पुस्तकाचा रौप्यमहोत्सव आपण साजरा करतोय. मागे वळून पहातो तेव्हा खरंच वाटत नाही. पुस्तकामुळे गेल्या 25 वर्षांत खाशाबा हे नाव घराघरात पोहचले. पुस्तक वाचून अनेक तरूण खेळाकडे वळाले. अनेकांनी कुस्ती खेळणे सुरू केले.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव खाशाबांवरील पहिले, एकमेव, अव्दितीय चरित्र पुस्तक आहे. त्याचा लेखक होण्याचा मान मला लाभला. कदाचित खाशाबांसोबत गतजन्मचे काही ऋणानुबंध असतील. माझा जन्मच खाशाबांची चरित्रगाथा लिहिण्यासाठी झाला असावा...
जीवनात काही गोष्टींची उत्तरे कधीच शोधता येत नाही. तुमचं नशिब तुम्हाला कोठे घेऊन जाईन हे सांगता येत नाही. मला इंजिनिअर व्हायचे होते. 1996 मध्ये बारावीनंतर मी एक वर्ष बीएससी वर्गातही प्रवेश घेतला होता. त्यानंतर सारंकाही बदलून गेले. घरातील वादळामुळे मला अचानकपणे कोल्हापूरातून पुन्हा पुण्यात यावे लागले. फर्ग्युसन महाविद्यालयात बी. ए करण्याचा निर्णय घेतला. कळत-नकळत माझा लेखक म्हणून प्रवास सुरू झाला. पत्रकारिकतेचा श्रीगणेशा झाला. सन 2000 मध्ये मी दै. लोकमत पुणे अवृत्तीचा पहिला क्रीडा उपसंपादक होतो. वर्षभरातच 2001 मध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तक हे पुस्तक माझे पहिले पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले. तेही तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते.

पुस्तकाची जन्मकथा
करनाम मल्लेश्वरीने 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जकले. तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंध्र प्रदेशच्या मल्लेश्वरीला 25 लाखांची थैली देऊन गौरविण्यात आले. खाशाबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान राखावा, ही साधी मागणी मी स्वतः तत्कालीन क्रीडामंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मुंबईत जाऊन केली. त्याच दिवशी संध्याकाळी मल्लेश्वरीला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रम संपताच मी थेट मुख्यामंत्र्यांना गाठले. “खाशाबांवर अन्याय होतोय, त्यांच्या कुटुंबियांनाही मदत केली पाहिजे,” अशी मागणी केली. माझ्यासह खाशाबांचे सुपुत्र रणजीत जाधव यांना धक्कबुक्की झाली. सार्या महाराष्ट्रात या घटनेचे प्रतिसाद उमटले. ‘आंध्रच्या मल्लेश्वरीला पैठणी, खाशाबांच्या आप्तांना धक्काबुक्की’ या मथळ्याने उभ्या महाराष्ट्रात बातम्या आल्या.
या घटनेनंतर खाशाबांना शासन, कुस्तीशौकिन, क्रीडाचाहते, कराडमधील नागरिकही का विसरले, याचा मी शोध सुरू केला. खाशाबांवर काही लेखन-पुस्तक आहे का, याचा धुंडोळा घेतला. मात्र काहीच हाती आले नाही. यातूनच ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ पुस्तकाचा जन्म झाला.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतानाच 1996 मध्ये ‘क्रीडामित्र’ या दिवाळी अंकाचे संपादन मी केले. या वेळी खाशाबांनंतर 44 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जकणार्या लिएंडर पेसचा जयघोष केला जात होता. तेव्हा दै, लोकसत्तामध्ये ‘खाशाबांचा वारसदार लिएंडर’ असा मी लेख लिहिला होता. लिएंडरच्या यशामुळे खाशाबांची आठवण क्रीडाक्षेत्राला झाली. या निमित्ताने खाशाबा जाधवांवर ‘क्रीडामित्र’मध्ये विशेष लेख लिहिण्याचे मी ठरवले. यासाठी कराडला त्यांच्या जन्मगावी मी गेलो होतो. येथूनच माझ्या पुस्तक लेखनाचा प्रवास सुरू झाला. खाशाबांवर कोणीतरी पुस्तक काढले असावे, असा माझा समज होता. प्रत्यक्षात कराडमध्ये त्यांच्या घरी गेल्यानंतर सविस्तर संदर्भ मिळालेच नाहीत. तुटकतुटक माहिती मिळाली. यावर माझे समाधान झाले नाही. पुण्याला परतताना खाशाबा जाधवांवर पुस्तक लिहिण्याचा विचार माझ्या मनात पक्का झाला होता.
सर्वप्रथम ‘क्रीडामित्र’ दिवाळी अंकात खाशाबा जाधवांची कथा आणि व्यथा मी मांडली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, अन्यायाची, अडथळ्यांची शर्यत शेवटपर्यंत सुरू असताना कष्टाने, जिद्दीने खाशाबांनी जकलेल्या ऐतिहासिक पदकाच्या कथेने मला प्रेरणा दिली. खाशाबांसाठी आपणही काहीतरी करण्याची आंतरिक ओढ लागली. शिक्षण, क्रीडा पत्रकारिकतेच्या धावपळीत काही वर्षं मला काहीच जमले नाही. जेथे जेथे संधी मिळत गेली तेथे मी खाशाबांवर झालेल्या अन्यायावर लिहीत असे. फर्ग्युसन महाविद्यालयाचे वार्षिक, क्रीडामित्र दिवाळी अंक, दै. लोकमत, दै. लोकसत्ता, दै. पुढारी, पाक्षिक षटकार यामध्ये मी खाशाबांची जीवनकथा थोडक्यात लिहिली होती. दरम्यानच्या काळात खाशाबांविषयी जे साहित्य मिळत गेले, त्याचा मी संग्रह करत गेलो. पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली होती. अपुर्या माहितीमुळे पानभरही नीट लिहिता आले नव्हते. तरीही पुस्तक लिहिण्याचा विचार मनात घोळतच राहिला.
अखेर खाशाबांच्या 76 व्या जयंतीपासून 15 जानेवारी 2000 मध्ये पुस्तक लेखनाचा श्रीगणेशा केला. विषयाचे क्रम ठरवले आणि त्यानुसार लेखन सुरू केले. क्रमानुसार लेखन करताना अनेक संदर्भ मिळत नव्हते. लेखनात सुसूत्रता येत नव्हती. वृत्तपत्रातील तुटपुंज्या शिदोरीवर पुस्तक लिहिणे शक्य नव्हते. म्हणून खाशाबा जाधवांचे कुटुंब, मित्रपरिवारातील लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून माहिती मिळविण्याचे ठरवले. फेब्रुवारी 2001 मध्ये मी दहा दिवस कराडला मुक्काम केला. खाशाबांचे बंधू दिनकर जाधव, बहीण श्रीमती तारूबाई, राजाराम महाविद्यालयातील मित्र दिनकर पाटील, यशवंत मोहिते यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळत गेली. कराडपासून लांब राहणार्या व्यक्तीच्या मी मुलाखती घेतल्या. बाबुराव चव्हाण, पोलीस दलातील खेळाडू संपत फडतरे यांच्याकडून जुने संदर्भ मिळाले.
खाशाबांना टिळक हायस्कूलमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या बाबुराव वळवडे गुरुजींची मी पुण्यात भेट घेतली. वयाच्या 85 व्या वर्षी वळवडे गुरुजी खाशाबांबाबत सर्व काही कालपरवा घडल्यासारखे सांगत होते. सातार्याला जाऊन त्यांचे टिळक हायस्कूलमधील मित्र हदूराव चव्हाण यांना भेटलो. भूमिगतांना मदत केल्याने आम्हाला मार खावा लागला हा प्रसंग हदूराव आजही मोठ्या अभिमानाने सांगतात. महिन्याभरात माहितीसाठी कराड, कोल्हापूर, साताऱ्याच्या मी तीन-चार वाऱ्या केल्या. अनेकांच्या भेटी घेतल्या. प्रत्येकजण खाशाबांबाबत नितांत आदर आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची हळहळ व्यक्त करीत. जुन्या काळातील लोकांना भेटताना, त्यांच्याशी बोलताना वेगळेच समाधान लाभत होते. प्रत्येकाकडून मला नवी माहिती मिळत होती. यामुळे पुस्तक आकार घेऊ लागले होते.
महिन्याभराच्या प्रवासानंतर पुन्हा पहिल्यापासून लेखन केले. काही त्रुटी आढळल्या. त्यासाठी पुन्हा कराड-कोल्हापुरात जाऊन संबंधितांच्या भेटी घेतल्या. खाशाबांबाबत जे जे उपलब्ध आहे ते सर्व कुसुम खाशाबा जाधव यांनी मला दिले. त्यांची प्रशस्तीपत्रके, जुनी पत्रे वृत्तपत्रातील कात्रणे यांची लेखनात खूप मदत झाली. खाशाबांबरोबर ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळविणार्या कृष्णराव माणगावे यांच्या कुटुंबीयांनी मला जुने संदर्भ देण्यासाठी सहकार्य केले. माणगावे यांच्या पत्नी सुनंदाताई यांनी हेलसकीच्या प्रवासात लिहिलेली डायरी मला दिली. यामुळे सविस्तर प्रवासवर्णन लिहिता आले.खाशाबांचे मित्र आणि जेष्ठ लेखक य. दि. फडके यांचे प्रस्तावनारूपाने आशीर्वाद लाभले.

- नॅशनल बुक ट्रस्टकडून प्रकाशन
गेल्या 25 वर्षांत खाशाबा जाधव चरित्र पुस्तकाच्या 18 आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. कोल्हापूरच्या मीनल प्रकाशनाने पहिल्या दोन आवृत्या प्रकाशित केल्या होत्या. सप्टेंबर 2001 च्या नांदेडमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुस्तकाचे शानदार प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खाशाबांच्या पत्नी कुसुतताई जाधव पुस्तक प्रकाशन समारंभास उपस्थित होत्या. हातोहात पहिली आवृत्ती संपली.
उभ्या महाराष्ट्रात पुस्तक गाजले. खाशाबांचा मराठीविश्वाला सर्वप्रथम परिचय झाला. 2004 मध्ये शालेय अभ्यासक्रमात नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात खाशाबांवरील दहा पानी धडा माझ्या पुस्तकातून घेण्यात आला. साऱ्या महाराष्ट्राच्या शाळेत, घरात खाशाबा पोहचले. याची दखल घेत केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टने पुस्तक 16 भाषेत सदर पुस्तक प्रकाशित करण्याचा करार केला. याला रणजीत खाशाबा जाधव यांनी हिरवा कंदील दर्शविला. आता हदी भाषेतूनही खाशाबांचे पुस्तक झाले. दै. सकाळ, दै. लोकसत्ता, दै, लोकमत, दै. पुण्यनगरी, दै. तरूणभारत, दै. पुढारी, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक मार्मिकसह 50 पेक्षा अधिक वृत्तपत्रात पुस्तकाचे परीक्षण प्रसिध्द झाले आहे.
खाशाबांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती 16 नोव्हेंबर 2007 रोजी कोन्हापूरच्या शाहू स्मारकात दिमाखदार समारंभात वाचकांसमोर आली. माजी खासदार उदयसह गायकवाड, प्रा. सुनीलकुमार लवटे व खाशाबांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झाले. कोल्हापूरात कुस्तीशौकिन मोठ्या संख्येने पुस्तक समारंभास उपस्थित होते. रणजीत जाधव यांनीही पुस्तकाबाबत आपले मनोगत व्यक्त करून लेखकांचे आभार मानले होते. - पुस्तकाची यशोगाथा
राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार, भाजपाचे माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, मनसे संस्थापक राज ठाकरे, अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह साऱ्या महाराष्ट्राने, देशाने हे पुस्तक वाचले आहे. 2013 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खाशाबा पुस्तकाची अकरावी आवृत्ती प्रकाशित केली. जानेवारी 2015 खाशाबा पुस्तकाची हिंदी आवृत्ती भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केली. खाशाबांच्या शताब्दी वर्षी जानेवारी 2024 मध्ये जन आवृत्ती लोकासमोर आली. साऱ्या महाराष्ट्रात तिचे स्वागत झाले.
खाशबांच्या जन्मदिनी 15 जानेवारी 2024 रोजी सातारा शहरात जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर व खाशबा जाधवांचे नातू अमरजीत रणजीत जाधव यांच्या हस्ते ही आवृत्ती प्रकाशित झाली. सातराचे पालकमंत्री शुभेराजे देसाई यांना खाशाबांच्या चरित्र पुस्ताकाची जनआवृत्ती रणजीत खाशाबा जाधव यांनी भेट दिली होती.
विकीपिडियाने खाशाबा जाधव पुस्तकाची नोंद घेतली आहे. 9 वी नंतर महाराष्ट्र शासनाचा बालभारती अभ्यासक्रम इयत्ता 6 वी पुस्तकात सध्या खाशाबा जाधवांचा धडा आहे. थोराची ओळख हे पाठाचे नाव असून या घराघरात खाशाबा हे नाव पोहचले आहे. 2004 मध्ये सर्वोत्कृष्ठ पुस्तकासाठी दिला जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या शाहू महाराज पुरस्काराने खाशाबा पुस्तकाच्या लेखकाचा गौरव करण्यात आला.
खाशाबा जाधव पुस्तकाची पायरसी असणाऱ्या आवृत्याही 2010 मध्ये 2013 मध्ये प्रकाशित झाल्या. 2010 मधील पायरसी आवृत्ती तर शासनाने खरेदी केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. पुन्हा असाच प्रयोग करून, मुखपृष्ठावर चुकीची माहिती छापून पायरसी आवृत्ती छापली गेली. पण ती बाजारात विक्रीला आली नार्हींत खाशाबा जाधव यांचे नाव पुस्तकरूपाने अजरामर होते. गुगलचा, सोशल मिडिया वापर हळूहळू वाढत गेला. पुस्तकातील माहिती आधारे गुगलवर, वेबसाईटवर, यू टयुबवर माहिती प्रकाशित होऊ लागली. तरीही आज खाशाबांचे संपूर्ण चरित्र सोशल मिडियावर उपलब्ध नाही. तुटक तुटक माहिती स्तोत्र उपलब्ध आहे. संपूर्ण खाशाबा जाधव यांच्या माहितीसाठी संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा हे पुस्तकाचे एकमेव पर्याय आहे. तरीही काही मंडळी संबंधित माहिती सोशल मिडियावर संपूर्ण खाशाबांची माहिती असल्याचे भासवून दिशाभूल करीत आहे. कॉपीराईट कायदयाची पायमल्ली करीत आहे. माझ्या रौप्यमहोत्सवी पुस्तकाची ही शोकांतिका दूर व्हावो हीच करवीरनिवासीनी अंबाबाई चरणी प्रार्थना….जय खाशाबा,जय ऑलिम्पिक

