
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरंगे
देवठाणे (ता. पन्हाळा) येथे भैरवनाथ वाचनालयाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अॅड. शाहू काटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे माजी सरपंच भरत मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाचनालयाचे संस्थापक शरद पाटील यांनी वाचनालय सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. गावोगावी लोप पावत चाललेली वाचनसंस्कृती पुन्हा जिवंत राहावी, या उद्देशाने भैरवनाथ वाचनालयाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अॅड. शाहू काटकर म्हणाले, सध्याच्या काळात युवा पिढी मोबाईलमध्ये अधिक गुंतत चालली असून त्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. कथा, कादंबऱ्या, कविता तसेच विविध विषयांवरील ग्रंथांचे वाचन वाढल्यास वैचारिक परिवर्तन घडू शकते. यासाठी गावोगावी वाचन चळवळ रुजणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी सागर जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भैरवनाथ वाचनालयाची सुरुवात सुमारे तीनशे पुस्तकांपासून करण्यात आली असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकाही सुरू करण्यात आली आहे.
कार्यक्रमास सुभाष कुंभार, जयसिंग पाटील, प्रदीप बंके, वाचनालय अध्यक्ष निलेश कुंभार, उपाध्यक्ष अक्षय पाटील, सचिव पुनम पाटील, ग्रंथपाल सुरेश पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवठाणे : भैरवनाथ वाचनालयाचे उद्घाटन करताना अॅड. शाहू काटकर, भरत मोरे, शरद पाटील व मान्यवर.

