विवेकानंद शिक्षणसंस्थेचा आधारवड : मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे

0
118

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा ८१ वा वाढदिवस दि. १७ जानेवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा घेतलेला हा आढावा.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षणसंस्थेची धुरा मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्या साथीने समर्थपणे सांभाळत आहेत. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली ही संस्था आज वटवृक्षाच्या रूपात विस्तारली असून महाराष्ट्र व कर्नाटकात संस्थेच्या तब्बल ४०६ शाखा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे स्वप्न या संस्थेमुळे साकार झाले आहे.
मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध शाखांमध्ये एम.बी.ए., एम.सी.ए., लॉ कॉलेज यांसारखे आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी संस्थेमार्फत चार नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांमध्ये साहेबांबद्दल आजही आदरयुक्त शिस्त आहे. कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. संस्थाप्रमुख असले तरी गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी ते खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख आहेत.
त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच संस्थेची प्रतिष्ठा व लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे या संस्थेचे सेक्रेटरी पद समर्थपणे सांभाळत असून मा. कौस्तुभ गावडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. साहेबांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन विविध संस्था व संघटनांनी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
डॉ. बापूजी साळुंखे यांनी प्रज्वलित केलेली ज्ञानज्योत आज घराघरांत पोहोचली आहे. ही संस्था भविष्यात एक ‘विवेकानंद ज्ञानपीठ’ म्हणून विकसित व्हावी, येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी घडावेत, यासाठी शिक्षकांनी आधुनिक शिक्षणपद्धती आत्मसात करून रोजगाराभिमुख शिक्षण द्यावे, हा मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा ठाम विचार आहे. “ज्ञान व चांगले विचार आयुष्याला योग्य दिशा देतात आणि ते ग्रंथातून मिळतात” हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे.
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पश्चात संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे आव्हानात्मक कार्य मा. अभयकुमार साळुंखे यांनी जिद्द, चिकाटी व सचोटीने अखंडपणे केले असून आजही ते तितक्याच ऊर्जेने कार्यरत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षातही त्यांचा उत्साह, उमेद आणि आशावाद गुरुदेव कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देत आहे.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शिक्षणप्रसाराच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करावे, अशी इच्छा मा. अभयकुमार साळुंखे यांच्यासह सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांची आहे.
मा. अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानशिदोरी’ उपक्रमाअंतर्गत वाचनयोग्य पुस्तके संकलित करून ती गरजू विद्यार्थ्यांना वितरित करणे, तसेच रक्तदान शिबिर यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजघडणीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, (शब्दाकंन- श्री.हितेंद्र साळुंखे सरचिटणीस महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचारी महासंघ.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here