
कोतोली प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
परिश्रम, शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून शेतीला नवे परिमाण देणाऱ्या दिगवडे गावातील श्री. सदाशिव कुलकर्णी यांची यशोगाथा आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
१९७७ साली जन्मलेल्या श्री. सदाशिव कुलकर्णी हे बी.कॉम पदवीधर असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेतीला आपले मुख्य कार्यक्षेत्र म्हणून स्वीकारले. सन १९८७ पासून शेती व्यवसायात सक्रिय असलेल्या कुलकर्णी यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर जाऊन आधुनिक व शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.
कुलकर्णी कुटुंबात एकूण सहा सदस्य असून सर्वजण शेती व्यवसायात एकत्रितपणे योगदान देत आहेत. त्यांचा मुलगाही बी.कॉम पदवीधर असून शेतीच्या दैनंदिन कामकाजात आईला सक्रियपणे मदत करतो. त्यामुळे शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रभावी वापर शेतीत होताना दिसतो. कुलकर्णी यांच्या पत्नी शिक्षिका असून शिक्षण आणि शेती यांचा सुरेख समतोल साधत कुटुंबाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत.
सुरुवातीला पारंपरिक शेती पद्धतींचा अवलंब केला जात होता. मात्र वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन कुलकर्णी यांनी २०१४–१५ साली ठिबक सिंचन पद्धती स्वीकारली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत झाली, खतांचा कार्यक्षम वापर शक्य झाला आणि उत्पादन खर्चात लक्षणीय घट झाली. परिणामी शेती अधिक लाभदायक ठरली.
ऊस पिकासाठी त्यांनी CO-7527 ही सुधारित जात निवडली असून या जातीमुळे त्यांना प्रति एकर ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळत आहे. यासोबतच त्यांच्या शेतात ऊस, भुईमूग आणि उन्हाळी भात अशी विविध पिके घेतली जात आहेत. पिकांची विविधता राखल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढले असून शेती अधिक शाश्वत झाली आहे.
आज कुलकर्णी कुटुंब दिगवडे गावात प्रगतिशील व आदर्श शेतकरी कुटुंब म्हणून ओळखले जाते. शिक्षणाची जोड, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कुटुंबातील एकोपा आणि अविरत मेहनत यांच्या जोरावर त्यांनी यशस्वी शेतीचा आदर्श उभा केला आहे.
श्री. सदाशिव कुलकर्णी यांची यशोगाथा ही इतर शेतकऱ्यांना निश्चितच नवी दिशा देणारी आणि प्रेरणादायी आहे.


