
कोतोली प्रतिनिधी–
भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे आयुर्वेद असून, तो केवळ रोगांवरील उपचार पद्धती नसून शरीर, मन, आत्मा आणि समाज यांचा समतोल साधणारे जीवनशास्त्र आहे, असे ठाम प्रतिपादन कोतोली येथील विठ्ठल क्लिनिकच्या डॉ. कौशल्या सुभाष चौगुले यांनी केले. आयुर्वेदाचा खरा उद्देश आजार बरा करणे एवढाच मर्यादित नसून आजार होऊच नये यासाठी जीवनशैली घडवणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अग्रणी महाविद्यालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मानवी आरोग्य आणि आयुर्वेद’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत त्या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करत होत्या. विद्यार्थ्यांनी आपले जीवन सुखी, समृद्ध आणि दीर्घायुषी करण्यासाठी आयुर्वेदाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी भूषविले. उद्घाटन प्रसंगी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्षाला पाणी घालून पर्यावरण-पूरक संदेश देण्यात आला.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना कोतोली येथील श्रीराम सिद्धी क्लिनिकचे डॉ. प्रथमेश जाधव यांनी आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान उलगडले. “आयुर्वेद ही उपचार पद्धती नसून जगण्याची शैली आहे. वात, पित्त, कफ यांचा समतोल बिघडल्यास आरोग्यावर परिणाम होतो. आहार, विहार आणि विचार यांचा योग्य समन्वय राखल्यास निरोगी जीवन शक्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले, “मानवी जीवन आणि आयुर्वेद यांचे अतूट नाते आहे.”

