
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरंगे
कोतोली (ता. पन्हाळा)
कोतोली गावच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय अस्तित्वाचा आधार असलेली वाण्याची विहीर आज गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, ही घटना संपूर्ण गावकऱ्यांच्या भावना दुखावणारी आहे. गावातील एकमेव जिवंत नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या या विहिरीत थेट मैलामिश्रित व रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याने गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
कणेरी रोडलगत असलेल्या या ऐतिहासिक विहिरीमध्ये दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या हद्दीतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर ठेकेदार श्री. निलेश घाटगे यांनी कोणतीही परवानगी न घेता खोदकाम करत मोठा सिमेंट नळा बसवून दुसऱ्या बाजूच्या नाल्यातील सांडपाणी आणि गाळ थेट विहिरीत सोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी, विहिरीतील पाणी अक्षरशः विषारी बनले असून, जलचर प्राण्यांचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नसून, गावच्या धार्मिक विधी, परंपरा आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याचा आधारस्तंभ आहे. मात्र, ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अमूल्य ठेवा नष्ट केला जात आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
या प्रकरणी कोतोली येथील नागरिक श्री. महादेव धोंडीराम पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तोंडी व दूरध्वनीद्वारे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच तीव्र झाला आहे.
“सांडपाणी तात्काळ थांबवावे, विहीर पूर्ववत स्वच्छ करून द्यावी आणि दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अन्यथा कोतोली गाव तीव्र आंदोलन छेडेल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
हा विषय केवळ एका विहिरीचा नसून, गावच्या अस्मितेचा, आरोग्याचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या हक्काचा आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवरच येईल, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


