
कोल्हापूर प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
समाजातील लैंगिक भूमिका, वर्तन व रूढ पूर्वग्रहांबाबत प्रत्येकाने सजग राहणे काळाची गरज आहे. रूढी-परंपरांच्या चौकटीत अडकून न राहता समान संधी, समान सन्मान आणि समानतेचा विचार जोपासला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करून समानतेचे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे. व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात समानतेचे समर्थन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नाइट कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सहायक प्राध्यापिका डॉ. अक्षदा गावडे यांनी केले.
पेठवडगाव येथील अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी येथे अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) यांच्या सहकार्याने ‘लैंगिक संवेदनशीलता आणि समानता’ या विषयावर आयोजित परिसंवादात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. गडद होते. यावेळी डी. फार्म, बी. फार्म आणि एम. फार्म विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ए. पी. गडद यांनी सांगितले की, महाविद्यालयात विविध उपक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद व व्याख्याने आयोजित करून जागतिक घडामोडी व सद्य:स्थितीबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाते, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शुभांगी सुतार यांनी केले. परिसंवादाला डॉ. संदीप बंडगर, प्रा. प्रियांका कांबळे, प्रा. अक्षता पाटील यांची उपस्थिती होती. परिसंवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक संवेदनशीलता, समानतेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीबाबत सकारात्मक विचारधारा विकसित झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

