
रत्नागिरी प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून ऑलिम्पिक वीर पद्मश्री खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त रत्नागिरी येथे आयोजित भव्य-दिव्य कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ शिक्षक व प्रेरणादायी वक्ते श्री. एम. डी. पाटील सर यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
एम. डी. पाटील सरांनी भारताला कुस्ती प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनप्रवासाचा सखोल व प्रेरणादायी आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत खाशाबा जाधव यांनी मिळवलेले यश, त्यांची शिस्त, जिद्द, देशप्रेम आणि क्रीडा विषयक समर्पण या गुणांमुळे ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी प्रभावीपणे मांडले.
“खाशाबा जाधव यांचे जीवन म्हणजे परिश्रम, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीचा जिवंत इतिहास आहे. त्यांच्या कार्यातूनच आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करावे,” असे मौलिक विचार एम. डी. पाटील सरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमामुळे रत्नागिरीकरांना भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक वीराची गौरवशाली गाथा नव्याने समजली. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयक जाणीव, देशाभिमान आणि ध्येयवाद वाढीस लागला.
राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवर व नागरिकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

