
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरंगे
दैनंदिन आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांच्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा अति वापर केला जात असून त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. यावर प्रभावी उपाय म्हणजे गांडूळ खत असून, हे सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करून तयार होणारे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. यात वनस्पतींसाठी आवश्यक अन्नद्रव्ये नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असतात. गांडूळ खताच्या वापरामुळे पर्यावरण संरक्षण होते, मातीची सुपीकता वाढते, पिकांचे उत्पादन व गुणवत्ता सुधारते आणि शेतकऱ्यांना कमी खर्चात आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर करून आपली शेती सुजलाम-सुफलाम करावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्राणीशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेलारवाडी (ता. पन्हाळा) येथे आयोजित गांडूळ खत निर्मिती व वाटप कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीही डॉ. विजयकुमार पाटील होते.
कार्यक्रमास संस्था सचिव शिवाजीराव पाटील, IQAC समन्वयक डॉ. बी. एन. रावण, सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. एम. वाय. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विभागामार्फत तयार करण्यात आलेले गांडूळ खत शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. ऋतुजा नाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पाटील यांनी केले, तर आभार प्रा. ट्विंकल सावंत यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागामार्फत शेलारवाडी (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्यांना गांडूळ खत वाटप करताना शिवाजीराव पाटील, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. ऋतुजा नाळे, प्रा. ट्विंकल सावंत, प्रा. प्रतिभा पाटील व मान्यवर.

