
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
ज्या मायेने आयुष्य घडवले, त्या मायेच्या आठवणींना सेवाभावाची ओंजळ अर्पण करत कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम भावनिक वातावरणात संपन्न झाले. दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून निसर्ग, शिक्षण आणि वृद्धांच्या सेवेसाठी उपक्रम राबवण्यात आले.
हणमंतवाडी (ता. करवीर) व पणोरे (ता. पन्हाळा) या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांचे चिरंजीव श्री. पुरुषोतम साळुंखे यांच्या हस्ते आंबा, फणस, चिक्कू, पेरू, नारळ, आवळा अशा उपयुक्त फळझाडांचे रोपण करण्यात आले. “आईच्या आठवणी मातीशी नाते सांगणाऱ्या झाडांतून सदैव जिवंत राहाव्यात” या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

मानवी संवेदनशीलतेचा धागा पुढे नेत मातोश्री वृद्धाश्रम, शिंगणापूर येथे रुपये ३,०५०/- इतकी रोख मदत देण्यात आली. आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची गरज असलेल्या ज्येष्ठांच्या सेवेसाठी हा हात पुढे करण्यात आला.
शिक्षण हीच खरी समाजसेवा या भावनेतून मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पणोरे (ता. पन्हाळा) या शाळेला पुस्तके खरेदीसाठी रुपये ५,०००/- ची देणगी देण्यात आली. ही देणगी सरपंच श्री. मारुती पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री. अमरसिंह संघर्षी, सौ. आकांक्षा पाटील, शिक्षकवृंद, प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या सर्व उपक्रमांचे आयोजन श्री. पुरुषोतम साळुंखे, श्री. सागर सूर्यवंशी, श्री. ऋषिकेश पाटील, संयम पाटील व हर्षराज सूर्यवंशी यांनी केले. सेवाभाव, कृतज्ञता आणि माणुसकीचा सुगंध दरवळवणारा हा दिवस उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.
फोटो कॅप्शन :
कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पणोरे येथे देणगी प्रदान करताना सरपंच श्री. मारुती पाटील, मुख्याध्यापक श्री. अमरसिंह संघर्षी, सौ. आकांक्षा पाटील, श्री. पुरुषोतम साळुंखे व श्री. सागर सूर्यवंशी.


