
गोकुळ प्रकल्पात २० लाख लिटर दूध संकलनाच्या अमृत कलश पूजनप्रसंगी ना. हसन मुश्रीफ, ना. प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ व अधिकारी-कर्मचारी.
कोल्हापूर प्रतिनिधी- पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) च्या वतीने गोकुळचे शिल्पकार स्व. आनंदराव ज्ञा. पाटील (चुयेकर) यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलन पूर्णत्वाचा अमृत कलश पूजन कार्यक्रम गोकुळ प्रकल्प, शिरगाव येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अमृत कलश पूजन गोकुळमधील ११ ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ना. हसन मुश्रीफ म्हणाले, “मागील वर्षी १८ लाख लिटर दूध संकलन झाले होते. आज २० लाख लिटरचा संकल्प पूर्ण झाला असून, पुढील स्मृतीदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास आहे.” दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी व संचालक मंडळाच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर म्हणाले, “गोकुळने २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा गाठला असून, ही कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. भविष्यात अमूलप्रमाणे देशपातळीवर आदर्श ठरेल असे कार्य गोकुळने करावे.”
आमदार सतेज पाटील म्हणाले, “शेतकरीकेंद्री धोरणे, योग्य दर व वाढीव दूध संकलनामुळे आज हा टप्पा गाठता आला आहे. पुढील काळात २५ लाख लिटरचे उद्दिष्टही निश्चित साध्य होईल.”
गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “७०० लिटरपासून सुरू झालेला गोकुळचा प्रवास आज लाखो दूध उत्पादकांच्या विश्वासावर उभा आहे. मुंबई व पुणे बाजारपेठेत गोकुळची मजबूत उपस्थिती असून, संघाच्या विविध विस्तार प्रकल्पांमुळे गोकुळ अधिक सक्षम होत आहे.”
यावेळी कंटीन्युअस बटर मेकींग मशिन, नवीन जनरेटर सेट व टीएमआर प्लांट विस्तारीत युनिटचे उद्घाटन करण्यात आले. २० लाख लिटर दूध संकलन पूर्ण झाल्याबद्दल चेअरमन व संचालक मंडळाचा विविध दूध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत अरुण डोंगळे, प्रास्ताविक विश्वास पाटील यांनी केले. आभार शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले.

