
कोल्हापूर | प्रतिनिधी : जानवी घोगळे
समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, संस्कार शिदोरी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष स्मिता खामकर या गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
महिलांना केवळ मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना *स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे, त्यांच्या हाताला काम देणे आणि आत्मनिर्भर बनवणे हेच स्मिता खामकर यांच्या सामाजिक कार्याचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. याच ध्येयातून त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम सुरू केले असून त्यामध्ये *गोधडी प्रशिक्षण उपक्रम हा विशेषतः लोकप्रिय व यशस्वी ठरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता, या उपक्रमाने इतर जिल्ह्यांमध्येही विस्तार घेतला असून शेकडो महिलांना या प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यात या उपक्रमाचा मोलाचा वाटा असून महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलले आहे.
स्मिता खामकर या विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असून त्यांचे कार्य सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांची धडपड आणि कार्यनिष्ठा ही अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
आज महिलांना रोजगाराभिमुख बनवून आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा ध्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत असून, स्मिता खामकर यांचा हा प्रेरणादायी प्रवास निश्चितच गौरवास्पद ठरत आहे.

