
तिटवे : प्रतिनिधी : प्रमोद पाटील
नैसर्गिक शेती ही केवळ शेती करण्याची पद्धत नसून ती मानवाच्या आरोग्याशी आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेशी जोडलेली एक जीवनशैली आहे, असे मत जागतिक कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केले. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात केले. ते पुढे म्हणाले रासायनिक खतं व जीवघेणे कीटकनाशके मातीची सुपीकता नष्ट करतात आणि अन्नाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम घडवतात. दुसरीकडे नैसर्गिक शेती जैवविविधतेचे जतन करून निरोगी, पौष्टिक आणि विषमुक्त अन्न निर्माण करते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचावतो आणि आरोग्यावरील खर्च कमी होतो. तसेच स्थानिक संसाधनांवर आधारित उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी सुरक्षित अशी नैसर्गिक शेती स्वीकारणे ही काळाची गरज आहे. नैसर्गिक शेती मिशनचा पहिला कार्यक्रम शहीद महाविद्यालयांमध्ये संपन्न झाला असे त्यांनी जाहीर केले.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर मातीशी नाळ असलेले भूमिपुत्र राज्य आणि देश स्तरावरील धोरण निर्मितीमध्ये सहभागी पाहिजेत. या दृष्टीने महाविद्यालयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले विद्यार्थिनींनी कॉर्पोरेट जगतात प्रवेश करा मोठ्या कंपन्यांमध्ये करिअर घडवा, पण आपल्या मातीशी असलेलं नातं हरवू देऊ नका. कुटुंबाच्या परंपरा आणि शेतीची मूल्यं जपण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. माती अभिमानाची आहे, तिला कमीपणा मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे.
यावेळी शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.महाजन ,शरद सहकारी सूतगिरण आकुर्डेचे उपाध्यक्ष अशोक फराकटे, असीमा मॅगझिन गोवाचे बिझनेस हेड चंद्रकांत पाटील सुळंबीकर, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री कार्यालयातील विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य तसेच केंद्रातील कृषी विपणन विभागात संचालक असलेले डॉ परशराम यांनी शहीद महाविद्यालयाच्या मदतीने नैसर्गिक शेतीचा पथदर्शी प्रकल्प राबवू असे सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले, तर समन्वयक म्हणून प्रा.विशालसिंह कांबळे यांनी भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन प्रा. साक्षी गुरव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रतिज्ञा कांबळे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा.दिग्विजय कुंभार, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

