
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
दिगवडे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे शेतकऱ्यांना आधुनिक भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी वांगी पिकामध्ये ग्राफ्टिंग (कलम) या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रभावी प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषी विद्यार्थिनींनी गावातील शेतकरी सदस्यांसाठी हे मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते.
या प्रात्यक्षिकामध्ये वांगीची ‘पूसा पर्पल लाँग’ (Pusa Purple Long) ही लोकप्रिय जात वापरण्यात आली. ग्राफ्टिंगसाठी Solanum torvum (जंगली वांगी) या वाइल्ड व रोगप्रतिकारक रूटस्टॉकचा वापर करण्यात आला. हा रूटस्टॉक मातीजन्य रोगांना विशेषतः वेल्ट व मुळकूज यांसारख्या घातक रोगांना प्रतिकारक असून, रोपांची जोमदार वाढ, अधिक उत्पादन आणि दीर्घकाळ टिकणारी फलधारणा यासाठी उपयुक्त ठरतो.
प्रात्यक्षिकासाठी लागणारी दर्जेदार व निरोगी रोपे आनंद लक्ष्मी नर्सरी येथून उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थिनींनी ग्राफ्टिंगचे महत्त्व, त्याचे फायदे, रोगांपासून संरक्षणाची क्षमता, उत्पादनात होणारी वाढ तसेच लागवडीनंतरचे योग्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष ग्राफ्टिंग करून दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान समजणे अधिक सोपे झाले.
हे प्रात्यक्षिक विद्यार्थिनी स्नेहल चौगुले, सुनिता भडारडा, वेदांती घाटोल, के. प्रवल्लिका व स्निशा एस. यांच्या पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे, डॉ. बी. टी. कोलगणे, डॉ. जे. एस. पाचपुते तसेच कार्यकारी अधिकारी डॉ. एस. एम. खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रात्यक्षिकानंतर उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, भविष्यात वांगी लागवडीत ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे दिगवडे परिसरातील शेतकऱ्यांना रोगमुक्त व अधिक उत्पादनक्षम शेतीकडे वाटचाल करण्याचा आत्मविश्वास मिळाला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आर्थिक उन्नती साधण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.

