
पन्हाळा प्रतिनिधी : xपांडुरंग फिरींगे
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दिगवडे गावामध्ये प्रगत सिंचन पद्धती अंतर्गत ठिबक सिंचन प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषी विद्यार्थिनींनी भेट दिली. या अभ्यास भेटीचा उद्देश विद्यार्थिनींना आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणे व त्याचे फायदे समजून घेणे हा होता.
यावेळी यजमान शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये बसवलेल्या ठिबक सिंचन प्रणालीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ठिबक सिंचनामध्ये पाण्याची बचत कशी होते, पिकांना आवश्यक तेवढेच पाणी थेट मुळांजवळ कसे दिले जाते, तसेच खत व्यवस्थापन (फर्टिगेशन) कसे प्रभावीपणे करता येते याविषयी मार्गदर्शन केले. ठिबक सिंचनामुळे पिकांची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि मजुरी खर्च कमी होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या अभ्यास भेटीत कृषी विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना विविध प्रश्न विचारून ठिबक सिंचन प्रणालीची रचना, देखभाल, खर्च, अनुदान योजना व त्याचे आर्थिक फायदे यांची सविस्तर माहिती घेतली.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रगत सिंचन पद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. भविष्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करताना हा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. या अभ्यास भेटीमुळे विद्यार्थिनींमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत उत्साह निर्माण झाला.
कृषी कन्या स्नेहल चौगुले, सुनिता भडारडा, वेदांती घाटोळ, के. प्रवल्लिका, स्निशा एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे, डॉ. बी. टी. कोलगणो, डॉ. जे. एस. पाचपुते तसेच कार्यकारी अधिकारी डॉ. एस. एम. खराडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी व इतर सदस्यांनी या माहितीपूर्ण उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

