आपलं उद्यान, आपली जबाबदारी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान

0
5

प्रतिनिधी : जानवी घोगळे

एखाद्या परिसराचं हृदय म्हणजे तिथलं उद्यान. पण जेव्हा हेच हृदय कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दाबलं जातं, साहित्याच्या मोडतोडीने विद्रूप होतं आणि व्यसनाधीनतेच्या धुराने गुदमरून जातं, तेव्हा उद्यानाचा श्वास खऱ्या अर्थाने कोंडला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची अवस्था काहीशी अशीच झाली होती. पण म्हणतात ना, ‘जिथे माणुसकी जिवंत असते, तिथे आशेचे अंकुर फुटतात.शासकीय मदतीची वाट न पाहता, ‘आपलं उद्यान, आपली जबाबदारी’ हा मंत्र जपत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील तरुण मुलं, उद्यानांमध्ये येणारे , ज्येष्ठ नागरिक आणि आबालवृद्ध दर रविवारी एकत्र येत आहेत. ज्या उद्यानाने आपल्याला सावली दिली, जिथे मुलांचे बालपण फुलले, त्याच उद्यानाला आज घरघर लागली असताना हे हात मदतीसाठी सरसावले आहेत.​”केवळ तक्रार करण्यापेक्षा बदल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे, हीच खरी देशसेवा आहे.​”


आज हे उद्यान केवळ झाडांचा समूह उरला नसून, ते समाजकंटकांच्या विळख्यात सापडत आहे. बागेतील साहित्याची मोडतोड झाली आहे, सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. हे उद्यान पुन्हा एकदा मुलांच्या हास्याने निनादावे आणि ज्येष्ठांना सुरक्षितपणे चार पावलं चालता यावे, यासाठी ही मंडळी दर रविवारी घाम गाळत आहेत. झाडांना पाणी घालणे, परिसर चकाचक करणे आणि उद्यानाचे पावित्र्य जपण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत.उद्यानाचा हा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी फक्त काही लोकांचे हात पुरेसे नाहीत. या चळवळीला कसबा बावड्यातील तुमच्यासारख्या सुजान नागरिकांच्या श्रमदानाची आणि सोबतीची गरज आहे. या रविवारी, आपल्या घरासाठी वेळ काढतो तसाच थोडा वेळ या सार्वजनिक घरासाठी (उद्यानासाठी) देऊया.
​चला, आपण सगळे मिळून या उद्यानाला सुरक्षित, स्वच्छ आणि हिरवेगार करूया. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि या मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ‘श्रमदाना’च्या या महायज्ञात सहभागी व्हा.
​तुमचे दोन हात उद्यानाचा चेहरा बदलू शकतात. येताय ना?

श्री. विशाल दिगंबर पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here