
कोतोली प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांनी फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारात भारताला पहिले कास्यपदक मिळवून दिले. उंची कमी असूनही वेगवान व आक्रमक खेळाडू वृत्तीमुळे ते ‘पॉकेट डायनामो’ या टोपणनावाने ओळखले जात होते, असे प्रतिपादन डॉ. एस. एस. कुरलीकर यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले, “ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव हे सर्वसामान्य कुटुंबातून आले असले तरी त्यांचे कार्य असामान्य होते. ते देशाचे भूषण होते; म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.”
यावेळी ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. एस. एस. कुरलीकर व सौ. सीमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. तेजस्विनी पाटील, सौ. सीमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. दत्तात्रय नाईक यांनी केले, तर आभार डॉ. यू. एन. लाड यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. एस. एस. कुरलीकर व सौ. सीमा पाटील; समवेत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सौ. तेजस्विनी पाटील, प्रा. दत्तात्रय नाईक, डॉ. यू. एन. लाड व मान्यवर.

