विवेकानंद कॉलेजमध्ये ‘संवाद लेखकाशी’ उपक्रम; तरुणांनी विवेक व वाचनाचा अंगिकार करावा

0
26


कोल्हापूर प्रतिनिधी : विनायक होगाडे

निसर्ग आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्याचवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व वाढत आहे. अशा काळात माणसाने मेंदूचा सजग वापर करून माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. मोबाईलच्या कह्यात गेलेल्या युवा पिढीने वाचनाकडे वळून विवेकाचा अंगिकार करावा, असे परखड मत ‘डिअर तुकोबा’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व बीबीसी न्यूज चॅनेलचे पत्रकार मा. विनायक होगाडे यांनी व्यक्त केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये इंग्रजी विभाग, वाङ्मय मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद लेखकाशी’ या उपक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय थोरात होते. याप्रसंगी IQAC च्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांची विशेष उपस्थिती होती.
आपल्या संवादात्मक शैलीत विनायक होगाडे म्हणाले, “लेखन म्हणजे केवळ शब्दांची रचना नव्हे, तर त्यामागे येणारी सामाजिक जबाबदारीही असते. सामाजिक अस्वस्थताच लेखकाला लिहिण्यास प्रवृत्त करते. तरुण लेखकांनी आपली मूळ संस्कृती विसरता कामा नये. इतरांचे अनुकरण न करता स्वतःची स्वतंत्र वाट शोधावी.”
अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. संजय थोरात म्हणाले, “साहित्य हा समाजाचा आरसा आहे. त्यातून मानवी भावना, विचार, इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडते. मात्र, दुर्दैवाने डिजिटल युगात साहित्य वाचन कमी होत चालले आहे. पुस्तकांची जागा मोबाईल आणि टीव्हीने घेतली आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा आस्वाद घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि करिअर घडवावे. विवेकानंद कॉलेज हे त्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. कविता तिवडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख कु. सानिका पलंगे हिने करून दिली. सूत्रसंचालन कु. संजना पाटील हिने केले, तर आभार पार्थ पोवार याने मानले.
या कार्यक्रमास डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. स्नेहल वरेकर, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. दीपक तुपे, डॉ. अवधूत टिपुगडे, डॉ. सिद्धार्थ कट्टीमनी, डॉ. आरिफ महात, प्रा. सनी काळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here