
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोतोली पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील पाच तरुणांची भारतीय सैन्यदलात भरती झाल्याने संपूर्ण माळवाडी परिसरात आनंद, अभिमान व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशसेवेचा व्रत स्वीकारलेल्या या तरुणांचे ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, माळवाडीच्या इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदला जात आहे.
भारतीय सैन्यात भरती झालेले तरुण –
शंतनू संदिप खोत,
यश दिपक खोत,
रोहित सरदार चौगुले,
आदित्य अनिल कळेकर,
प्रणव प्रकाश खापणे
या पाचही तरुणांनी कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि प्रखर जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या आनंदाच्या प्रसंगी ग्रामस्थांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटप करून जल्लोष केला. तरुणांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. “देशासाठी लढत राहणार, देशाच्या सन्मानासाठी सदैव सज्ज राहणार,” असा निर्धार या तरुणांनी व्यक्त करताच उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू तर चेहऱ्यावर देशभक्तीचे तेज झळकले.
माळवाडीच्या या पाच वीरपुत्रांनी युवकांसमोर आदर्श ठेवत “देशसेवा हीच खरी साधना” हा संदेश दिला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांमध्ये सैन्यभरतीसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली असून, माळवाडीचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उजळले आहे.

