
प्रतिनिधी:कोल्हापूर पांडुरंग फिरींगे
मुंबई | जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांनी ठाणे (मुंबई) येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.ठाणे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास पाटील यांचे शिवसेना पक्षात स्वागत करत त्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याचा गौरव केला.विश्वास पाटील (आबाजी) हे गेल्या अनेक दशकांपासून सहकार चळवळीत सक्रिय असून, गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य घटकांच्या हितासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पारदर्शक कारभार, संघटन कौशल्य आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.या पक्षप्रवेशावेळी विश्वास पाटील यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र सचिन पाटील, यशवंत बँकेचे माजी चेअरमन एकनाथ पाटील, बुद्धीराज पाटील (महे), नंदकुमार पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष अनिल सोलापुरे, रयत संघाचे संचालक तसेच विविध सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “सहकार क्षेत्रातील अनुभवी व तळागाळाशी जोडलेले नेतृत्व शिवसेनेत आल्याने पक्षसंघटन अधिक बळकट होणार आहे.” विश्वास पाटील यांचा अनुभव आणि मार्गदर्शन ग्रामीण भागात शिवसेनेच्या कार्याला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, एस. आर. पाटील (चिखलीकर), करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील, कुंभी–कासारी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, संचालक किशोर पाटील, उत्तम वरुटे, संजय पाटील, पंडित हुजरे, सामाजिक कार्यकर्ते अमित वरुटे, राहुल पाटील, माधव पाटील, एस. के. पाटील, पंडित वरुटे, पार्थ पाटील, राजवीर पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार व करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेला अधिक भक्कम आधार मिळणार असून, संघटनात्मक बांधणीस निश्चितच चालना मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

