
कोल्हापूर | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
“आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करत असताना समाजाप्रती असलेली जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे,” या भूमिकेतून कोल्हापूर म्युच्युअल फंड असोसिएशन (MF-09) आणि हॉटेल रेडीयंट, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 जानेवारी 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल 109 जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले. शिबिराचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कोल्हापूर म्युच्युअल फंड असोसिएशन, हॉटेल रेडीयंट आणि अर्पण ब्लड बँक यांनी उत्कृष्ट समन्वय साधत संपूर्ण व्यवस्थापन अत्यंत सुयोग्यरीत्या हाताळले. रक्तदात्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या रक्तदान शिबिरात कोल्हापूर विभागातील म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, म्युच्युअल फंड कार्यालयातील कर्मचारी तसेच गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजोपयोगी कार्यात आपले योगदान दिले.

विशेष म्हणजे कोल्हापूर म्युच्युअल फंड असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेले हे पाचवे रक्तदान शिबिर असून, भविष्यातही अशाच प्रकारचे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.या उपक्रमामुळे व्यवसाय आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडून आला असून, MF-09 व हॉटेल रेडीयंटचा हा उपक्रम शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

